औंध पोलिस ठाण्याचे कारभारी लोकसेवक कि अवैध व्यवसाय सेवक?

संबंधित कारभारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी

पुसेसावळी : औंध पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना उधाण आलं आहे. विद्यमान कारभाऱ्यांच्या आशीर्वादानेच अवैध धंदे फोफावले असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. गौण खनिज तस्करी व अवैध दारू, गुटखा, गांजा विक्री तर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. परंतु आता चक्री, सोरट अड्डेही ठिकठिकाणी थाटण्यात आले आहेत.                  औंध हद्दीतील गावांसह पुसेसावळी येथे राजरोसपणे मटका, गुटखा, गांजा अड्डे चालविले जात असतांना कारभारी मात्र बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहेत. याला कारणीभूत संबंधित बिट अंमलदार नसून कारवाईची नकारात्मकता दाखविणारे विद्यमान कारभारीच आहेत. एवढेच नाही तर औंध पोलिस स्टेशन हद्दीतून गोवंश तस्करीही होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारवाई मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून गोवंश नसलेल्या आणि शेतकऱ्यांनी स्वतःहून विक्री केलेल्या पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अवैध धंदे रोखण्याकरिता कारभाऱ्यांकडून घेण्यात येत असलेली नकारात्मक भूमिका बघता अवैध धंद्यांना कारभाऱ्यांचेच पाठबळ मिळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यांच्या मधुर संबंधांमुळे अवैध धंद्यांना रान मोकळं झालं असून अवैध व्यावसायिक निर्धास्त झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कमान सैल असल्याने कारभाऱ्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथे आळी मिळी गुप चिळी सुरु असल्याची चर्चा आता चवीने चघळली जात आहे.       

 औंध पोलिस स्टेशन हद्दीत विद्यमान कारभाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे फळफुलाला आले आहेत. याठिकाणी अवैध व्यावसायीकांनी आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. हप्त्यात गुंतलेली कारभाऱ्यांची ठराविक यंत्रणा वजा "किरण" अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. त्यांच्या हितसंबंध जोपासण्यामुळे अवैध व्यावसायिकांना अभय मिळताना दिसत आहे. तर छुप्या पाठबळामुळेच अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सर्रास सुरु असलेली गौण खनिज तस्करी, बिनधोक सुरु असलेली अवैध दारू, गुटखा, गांजा विक्री पोलिस कर्मचाऱ्यांची नव्हे तर कारभाऱ्यांचीच निष्क्रियता दर्शवित आहे. औंध पोलिस स्टेशन हद्दीतून गोवंश तस्करीही सुरु असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे याकडे आता वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

 औंध पोलिस स्टेशन हद्दीत मटका, चक्री, सोरट अड्डेही राजरोसपणे सुरु आहेत. औंधसह पुसेसावळी येथे मटका, चक्री आणि सोरट अड्डे चालविले जात असतांना कारभाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. खुलेआम अवैध धंदे सुरु असतांना पोलिस मात्र आंधळेपणाचं सोंग घेऊन आहेत. पुसेसावळी येथे मोठ्या प्रमाणात मटका, चक्री, सोरट आणि जुगार खेळला जात आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाचा पैसा यामध्ये आकडे खेळण्यात उडवू लागले आहेत. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. मात्र पगारापेक्षा कित्येक पटीने मिळणारे "हिरवे" कागद आणि त्यामुळे मिळत असलेले ऐशोआराम कारवाईस अडथळा निर्माण तर करत नाहीत ना अशा प्रकारे चर्चा जनसामान्यांमध्ये चवीने सुरू आहे. तर खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायांच्या अड्ड्यांवर आकडे लावण्याकरिता नागरिकांची उडत असलेली झुंबड पोलिसांच्या दृष्टीस पडू नये, हे संशयास्पद वाटते. 

 औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकड्यांच्या आहारी गेलेले नागरिकांचे कुटुंबातील सदस्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नोकरदार वर्गाबरोबरच मजूरवर्गही मटक्याच्या आकड्यांवर नशीब आजमावण्यात आपली मिळकत गमावतांना दिसत आहे. तरुणांनाही अवैध व्यवसायांचे प्रचंड व्यसन लागल्याने त्यांचं भविष्य उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आलं आहे.औंधचे संबंधित कारभारी या अवैध मटका, गुटखा , गांजा, चक्री , सोरट च्या अड्ड्यांवर कार्यवाही करण्याचं सौजन्य दाखवीत नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या छुप्या परवानगीनेच तर मटका अड्डे सुरु नसावे, या खुल्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यांच्या मधुर संबंधांमुळेच अवैध धंद्यांना चालना मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहेत. गौण खनिज तस्करी, दारू, गुटखा , चक्री,सोरट, गांजा व गोवंश तस्करी औंध पोलिस स्टेशन हद्दीतून होत असतांना याची भनक पोलिसांना लागू नये, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. औंध पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे प्रचंड फोफावले असतांना ते रोखण्याकरिता पोलिस उदासीनता दर्शवित असल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे याकडे आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज असून संबंधित पोलिस उपनिरीक्षक आणि बीट अंमलदार यांना थेट कारवाई चे आदेश देऊन कारवाई यशस्वी झाल्यास संबंधित कारभारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त