वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वामुळे कावडीची विकास झेप; मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

मेढा : जावळी तालुक्यातील धरणग्रस्त कावडी ग्रामपंचायतीने विकासाची नवी ओळख निर्माण करत मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानात सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामागे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, ग्रामपंचायतीचे नियोजनबद्ध कामकाज आणि ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग हे प्रमुख घटक ठरल्याची भावना गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.


या उल्लेखनीय कामगिरीनंतर विभागीय मूल्यमापन समितीने बुधवारी कावडी ग्रामपंचायतीची सखोल पाहणी केली. पाहणीनंतर समितीचे अध्यक्ष तथा अहिल्यानगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी कावडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे कौतुक करत, “जावळीसारख्या दुर्गम आणि धरणग्रस्त भागातील कावडी ग्रामपंचायतीने विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. राज्यस्तरावरही कावडी निश्चितच उल्लेखनीय ठसा उमटवेल,” असा विश्वास व्यक्त केला.


ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, स्वच्छता व्यवस्था, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, जलसंवर्धन आदी उपक्रमांची समितीने पाहणी करून समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या उपहारगृह उपक्रमाचे समितीने विशेष कौतुक केले. या उपक्रमातून स्थानिकांना रोजगार मिळत असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होत असल्याने तो इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरू शकतो, असे मत समितीने व्यक्त केले.


जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी ग्रामविकासात लोकसहभागाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विविध विकासकामांसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा, निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या भूमिकेमुळे कावडीने ही यशस्वी झेप घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले, “महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामस्थांची एकजूट आणि विकासासाठीची सामूहिक बांधिलकी हीच कावडीची खरी ताकद आहे. प्रत्येकाने गाव आपले समजून योगदान दिल्यामुळेच आज हे यश मिळाले आहे. राज्यस्तरावरही कावडीचे नाव अभिमानाने झळकावे, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू.”


विभागीय समितीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने समितीचे स्वागत करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद यामुळे गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.


यावेळी समितीचे सदस्य रामप्रसाद लाहोटी, राजन पाटील, दादासाहेब गुंजाळ, पी. एस. म्हस्के, रवींद्र महाजन, राहुल देसाई, सरपंच यशवंत मानकुमरे, गटविकास अधिकारी निलेश पाटील, ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धरणग्रस्त आणि दुर्गम भागातील गावाने विकासाचा आदर्श निर्माण करत जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवले आहे. वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून घडलेली ही विकास झेप आता राज्यस्तरावरही कावडीचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला