औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?

"त्या" नवजात शिशूच्या मृत्यूस जबाबदार परिचारिका, वैद्यकीय अधिकारी की जिल्हा आरोग्य अधिकारी?

पुसेसावळी : औंध ग्रामीण रूग्णालय एका नवजात शिशूच्या मृत्यूस आणि गरोदर महिलेसाठी त्रासदायक ठरला असल्याची घटना समोर आली आहे. शासनाने नुसती इमारतीचे टोलेजंग बांधकाम केले आहे. परंतू ना निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत ना पुरेसे कर्मचारी विशेष म्हणजे संपूर्ण रूग्णालयात एकही सिसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचेकडून होत असलेल्या हलगर्जीपणाचे पुरावेही नाहीत. 

    औंध येथील स्थानिक रहिवासी असलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेस वेदना सुरू झाल्याच्या कारणाने औंध येथील ग्रामीण रुग्णालयात तिचे पती समिर सय्यद हे दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी घेऊन गेले होते. परंतू त्या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यावेळी मात्र एकमेव कर्तव्यावर असलेल्या महिला परिचारिका यांनी संबंधित महिलेची तपासणी करत सामान्य रूग्णालय, सातारा रूग्णालय यांचेकडे रूग्णाला दाखल करून घेण्यासाठी आवश्यक असलेले स्थानांतरणाचे पत्र तातडीने देत वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने प्रसंगावधान दाखवून जबाबदारी पार पाडली कि झटकली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. 

    स्थानांतरण पत्र दिल्यानंतर रूग्णालय परिसरात दिमाखात उभी असलेली गरोदर माता आणि नवजात शिशूच्या सेवेकरिता १०२ ची रूग्णवाहीका देणे अपेक्षित असताना ती न दिल्याने संबंधित रूग्णाचे नातेवाईकाने १०८ च्या रूग्ण वाहिकेला सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला ती अंदाजे ९:५० वाजण्याच्या सुमारास उपलब्ध झाली. दरम्यान संबंधित महिलेस अति वेदना सुरू झाल्याच्या कारणाने रूग्णाला आत घेण्याची विनंती केल्यानंतर "तुम्हाला रेफर चिठ्ठी दिली आहे, तीला येथून घेऊन जा" असे बेजबाबदारपणाचे वर्तन करण्याचे कृत्य संबंधित परिचारिका यांनी केले. त्यामुळे समिर याने पत्नीसह दुचाकीवरून घरी जाऊन सातारा येथील रूग्णालयात आवश्यक असलेले अंथरूण, पांघरूणसह इतर साहित्य घेऊन पुन्हा ग्रामीण रूग्णालयात उपस्थित झाले. त्याचवेळी पुन्हा वेदना सुरू झाल्याने समिर ने उपस्थित परिचारिका यांच्या मदतीने पत्नीस रूग्णालयात नेले असता त्याच वेळी प्रसूती झाली. परंतू नवजात शिशू मात्र मयत झाले असल्याचे दिसून आले. 


  नातेवाईक आणि मित्रमंडळी तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गोंधळ उडाला होता. काही वेळाने वैद्यकीय अधिकारी चव्हाण हे रूग्णालयात उपस्थित झालेने संबंधित झालेला प्रकार त्यांना सांगत बालकाचे मृत शरीर शवविच्छेदन केल्याशिवाय ताब्यात घेणार नसल्याची भूमिका संबंधित पिडितेच्या नातेवाईकांनी घेतली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांचेकडून "आपल्या रूग्णालयात मुळातच अत्यल्प कर्मचारी असल्याने वरिष्ठांकडे मी वारंवार कर्मचाऱ्यांची लेखी मागणी केली आहे. तरीही कर्मचारी देण्यात आलेले नाही. संबंधित परिचारिका ही वयस्कर असून तीला ही दम्याचा त्रास असलेने तीला ऑक्सिजन लावावे लागते.बाळाची अवस्था पाहून जन्मापुर्वीच मयत झाले असून तूम्ही लेखी स्वरूपात तक्रार दाखल करा मी संबंधित परिचारिकेवर योग्य ती कारवाई करणेबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करतो." असे सांगितल्याने त्यांच्या आजपर्यंतच्या गुणवत्ता पुर्ण कामांची पद्धत लक्षात घेऊन विश्वास ठेवत संबंधित मयत नवजात शिशू ताब्यात घेऊन त्याचा दफनविधी करण्यात आला. त्यामुळे सदरच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याची माहिती सातारा न्यूज ला समिर सय्यद यांनी दिली.

वयस्कर परिचारिका श्रीमती खाडे यांचे कृत्य घातकच. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आलेल्या अत्यवस्थेतील रूग्णाला दाखल करून घेत प्राथमिक उपचार सुरू करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने कळविणे आवश्यक होते. परंतू संबंधित परिचारिका यांनी तसे न करता स्वतः त्या महिलेची तपासणी करून स्थानांतरण पत्र दिले. त्यावर वैद्यकीय अधिकारी यांचा शिक्का मारून फॉर म्हणून सही केली. या स्थानांतरण पत्रामध्ये नवजात शिशू च्या हृदयाचे ५८ ठोके पडत असल्याचे तर संबंधित महिलेचा रक्तस्राव होत असल्याचे नमुद केल्याचे दिसून येते.तर त्यावर तपासणी केल्याच्या वेळेचा उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे परिचारिकेला स्थानांतरण पत्र तयार करून त्यावर सही करण्याचा अधिकार आहे काय? असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकताच काय आहे? अशा प्रकारच्या चर्चा नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण संशयास्पदच. मयत नवजात चे दफनविधी केल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळ तीन दिवसांपूर्वी पोटातच मयत झाले असल्याचे सांगितले असे रूग्णाचे नातेवाईक सांगतात. परंतू प्रसुतीच्या काही वेळेपुर्वी केलेल्या तपासणीत नवजात शिशूच्या हृदयाचे ५८ ठोके पडत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात उपस्थित असते तर रूग्णाला परिचारिकेकडून मिळालेली वागणूक कदाचित मिळाली नसती. शिवाय गर्भवती महिलेस नाहक त्रासासह नवजात शिशू गमावण्याच्या घटनेला कदाचित सामोरे जावे लागले नसते अशाप्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने आवश्यक कर्मचारी पुरवठा करणे गरजेचे. औंध ग्रामीण रूग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा आणि मागणीचा अहवालात पाठवल्याची तोंडी माहिती दिली. मग संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कर्मचाऱ्यांचा पुरवठा आजतागायत का करण्यात आला नाही? शिवाय कर्तव्यावर असलेल्या वयस्कर परिचारिका श्रीमती खाडे यांना दम्याचा आजार असून त्यांनाच ऑक्सिजन लावण्याची गरज असते. असेही संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे आधीच अत्यल्प कर्मचारी आणि त्यातही असलेले कर्मचारीच ऑक्सिजन वर आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असेल तर रूग्णांच्या सेवेची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यातच असणार यात शंका नसावी..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला