जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
गणेशोत्सवातील हलत्या देखाव्यांमागील ‘कल्पक हात’ काळाच्या पडद्याआडSatara News Team
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा: साताऱ्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील हलत्या देखाव्यांना तांत्रिक कल्पकतेची जोड देणारे, श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक सुरेंद्र ऊर्फ नाना रंगराव शालगर (वय ७७) यांचे आज शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापारी गणेशोत्सव मंडळासह सामाजिक, धार्मिक व व्यापारी क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
कल्पक तंत्रज्ञ, सामाजिक-धार्मिक कार्यातील सक्रिय कार्यकर्ता आणि सर्वांना आपलेसे करणारा दिलदार माणूस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने व्यापारी गणेशोत्सव मंडळाचा एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. खासदार श्रीमंत छ. उदयनराजे, राजमाता श्रीमंत छ.कल्पनाराजे, मा. मंत्री आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोंसले यांसह शहरातील मान्यवरांनी राहते घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शुक्रवारी सायंकाळी संगम माहुली येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाना शालगर यांचे नाव साताऱ्यातील श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या जुन्या वैभवाशी घट्ट जोडले गेले होते. एकेकाळी मंडळाचे हलते आणि यांत्रिक देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असे. या देखाव्यांमागील यंत्रणा, तांत्रिक रचना आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात नानांचा मोठा वाटा होता. उपलब्ध साधनसामग्रीतून कल्पक प्रयोग उभे करण्याचे त्यांचे कौशल्य अनेकांना अचंबित करणारे होते.
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते. १९९० च्या दशकातील श्रीराम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. श्रीराम रथयात्रेसाठी त्यांनी कल्पकतेने तयार केलेला रथ त्या काळात विशेष आकर्षण ठरला होता. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होताना तांत्रिक कौशल्याचा उपयोग करण्याची त्यांची हातोटी वेगळी होती.
त्यांच्या कल्पकतेचा आणखी एक उल्लेखनीय नमुना म्हणजे त्यांनी स्वतः तयार केलेली छोटी चारचाकी. मारुती ८०० सारख्या छोट्या मोटारी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच नानांनी डिझेल इंजिनवर चालणारी छोटी चारचाकी तयार केली होती. या गाडीला प्रतिलिटर सुमारे ३५ किलोमीटर मायलेज मिळत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. या वाहनाला आरटीओची परवानगीही मिळाली होती. मात्र, पुढे व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेने त्याचे रूपांतर होऊ शकले नाही. तरीही त्या काळात स्वतःच्या कल्पनेतून वाहन उभे करण्याचा त्यांचा प्रयोग त्यांच्या तांत्रिक प्रतिभेची साक्ष देणारा ठरला.
तंत्रज्ञानाची आवड जितकी प्रखर, तितकाच त्यांचा स्वभाव मोकळा आणि माणसे जोडणारा होता. दिलदार, खुल्या मनाचा आणि ‘जगन्मित्र’ म्हणून त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. व्यापारी गणेशोत्सव मंडळाला नावारूपाला आणण्यात त्यांनी दिलेले योगदान आणि पडद्यामागे राहून केलेले काम जुन्या कार्यकर्त्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 18th Sep 2026 06:24 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 18th Sep 2026 06:24 pm












