सेगमेंटल उड्डाणपुलासाठी उंब्रज ग्रामस्थांची मागणी


उंब्रज येथे कराडच्या धर्तीवर सेगमेंटल पूल व्हावा, यासाठी उंब्रज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज सौभाग्य मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेत महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी कशा पद्धतीने अन्याय करत आहेत, याचे गाऱ्हाणे मांडले.
उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील सेगमेंटल उड्डाणपूल होत नाही, तोपर्यंत उंब्रज हद्दीत महामार्ग प्राधिकरण विभागाने इतर कोणतेही काम सुरू करू नये. जबरदस्तीने दबाव आणून काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ बंद पाडू, असा इशारा उंब्रज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय ग्रामस्थांनी दिला.

उंब्रज येथे कराडच्या धर्तीवर सेगमेंटल पूल व्हावा, यासाठी उंब्रज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज सौभाग्य मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेत महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी कशा पद्धतीने अन्याय करत आहेत, याचे गाऱ्हाणे मांडले. 

उड्डाणपुलासाठी एकत्रित येऊन सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामपंचायत व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने शासन दरबारी मागणी करण्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला तरी बेहत्तर; परंतु आता मागे हटायचे नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरपंच योगराज जाधव म्‍हणाले, ‘‘शासनाने दडपशाही करून उंब्रज परिसरातील जनतेची संविधानिक मागणी दाबण्याचा प्रयत्न केल्यास जनतेच्या सोयीसाठीप्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल. 

उंब्रजला उड्डाणपुलाऐवजी भराव पूल झाल्याने वीस वर्षांपासून अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भीषण अपघात होऊन अनेक निष्पाप जीव गेले आहेत. सेवा रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते.

एसटी बस स्थानकात येण्यास अडथळा होत आहे. प्रवाशांना धोकादायकरीत्या महामार्गावर बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. उंब्रजसह परिसरातील गावांमधून शाळेसाठी मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.’’

कोणतेही अधिकचे भूसंपादन न करता ४८ मीटरमध्ये सेगमेंटल पूल होत असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण अधिकारी देत आहेत. यासाठी १४७ कोटींचे अंदाजपत्रक सुद्धा मंजुरीसाठी गेले आहे.

मग महामार्ग ठेकेदार तारळी आणि शिवडे येथील नदीवरील पूल पाडण्यासाठी का गडबड करीत आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. २००४ मध्ये प्रशासनाने अशीच भूलथाप मारून बळाचा वापर करून काम पूर्ण केले होते; परंतु गेल्या वीस वर्षांत उंब्रज परिसराने काय यातना भोगल्यात, हे येथील नागरिकांनाच माहिती आहेत, अशीही माहिती सरपंच योगराज जाधव यांनी दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, सुधाकर जाधव, प्रशांत पाटील, उमेश काशीद, किसन माळी, नामदेव कांबळे, तसेच माजी उपसरपंच अजित जाधव, सोमनाथ जाधव, विकास जाधव, डॉ. दीपक माने, जयवंत जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, शरद जाधव, अमोल कांबळे, रणजित कदम, संजय पाटील, दिगंबर भिसे, विलास आटोळे, उत्तम कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रशासन दबावाचा वापर करीत आहे, यामुळेच पत्रकार, ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासमवेत एक बैठक आयोजित केली. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. यामुळे सेगमेंटल पुलाची मागणी कोणत्याही परिस्थितीत लावून धरणार आहे. तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्यास ग्रामस्थ मागे हटणार नाहीत. प्रशासनाने दबाव आणल्यास संविधानिक मार्गाने सर्वपक्षीय लढा तीव्र स्वरूपात उभारला जाणार आहे. - योगराज जाधव, सरपंच उंब्रज

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला