कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?

शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. शरद ऋतुनुसार चर्या कशी असावी,

 या ऋतुमध्ये आपल्या आरोग्याला जागरण करणे कसे पोषक आहे, हे जाणून घेऊया.

 हा ऋतु नावाप्रमाणेच सर्वात डेंजर ! सर्वात जास्त अचानक मृत्यु याच ऋतुमध्ये होत असावेत. असा खतरनाक ऋतु आहे. पाऊस थांबलेला असतो. परतीच्या पावसाच्या वादळी वार्‍याचा फटका बसलेला असतो. तापलेल्या जमिनीवर पडलेल्या पाण्याच्या वाफेने वातावरणातील उष्णता वाढते. ती उष्णता अंगातील, रक्तातील गरमी पण वाढवते. 

 ही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दोन उपाय खात्रीचे आहेत. विरेचन आणि रक्तमोक्षण. विरेचन म्हणजे जुलाबावाटे पित्त बाहेर काढणे. यासाठी एरंडेल हे एक नंबर औषध आहे. यासाठी प्रौढांसाठी सहा चमचे (तीस मिली) रात्री झोपताना सलगपणे तीन दिवस घेणे. बेस्ट उपाय आहे. तीन चार जुलाब होतात. पित्ताचे विरेचन होते. आणि पुढे सहा महिन्यासाठी पित्ताला शांत ठेवता येते. ज्यांना एरंडेल घ्यायचा कंटाळा येतो, त्यांनी दुध पिऊन विरेचन करावे. 

 यासाठी मसाला दुध तयार करावे. ह्या दुधाने विरेचन होणे अपेक्षित असते. दुधातील कफ वृद्धी करणारे दोष कमी व्हावेत, यासाठी हे दूध मसाल्यांनी सिद्ध करून घ्यावे

. (आता दुध म्हणजे गायीचे, आणि गाय भारतीय बनावटीचीच हवी, हायब्रीड जर्सी वगैरे नको, म्हैशीचे दुध नको, हे गृहित धरले आहे. आमच्याकडे मिळत नाही तर काय करू, तुम्ही असे दुध तयार करून विकता का ? वगैरे प्रश्न कृपया विचारू नयेत. ???? ) 

 एक लीटर मसाला दुध तयार करण्यासाठी साहित्य आणि कृती देत आहे. दुध प्रथम कोमट करून घ्यावे. एका कल्हई केलेल्या पितळी पातेल्यात किंवा स्टीलच्या पातेल्यात साधारणपणे 50 मिली गायीचे तूप घ्यावे. अग्निवर ठेवून तूप पातळ झाले की, त्यात चार लवंगा, चार काळे मिरी, पाव इंच दालचिनी, अर्धा चमचा बडिशेप, अर्धा चमचा सुंठ पावडर किंवा तेवढाच सुंठीचा तुकडा, सात आठ हिरव्या वेलचीच्या साल काढून बीया, धने तीन चमचे आणि एका जायफळाचा सहावा भाग तुकडे करून घ्यावेत. हा सर्व मसाला मंद अग्निवर पातेल्यातील तुपात परतून घ्यावा. थोडासा मसाल्याचा दरवळ आला की त्यात एक ग्लास पाणी ओतावे. आणि अग्नि मंद करून एक ग्लास पाण्याचे अर्धे होईपर्यंत आटवावे. जेणेकरून मसाला न जळता आपला वास आणि औषधी गुणधर्म तुपात सोडेल. तूपात घातलेले पाणी तडतडणे बंद झाले की अग्नि बंद करावा. तूप पातळ असतानाच गाळून घ्यावे. गाळल्याने सर्व खडा मसाला वेगळा होईल. आता ह्या मसाला तुपात एक लीटर दुध ओतावे. आपल्या आवडीप्रमाणे ( साधारणपणे पाव किलो ) खडीसाखर, गोडपणानुसार कमी जास्त करून योग्य प्रमाणात घालावी. साखर विरघळेपर्यंत ढवळत रहावे. तुपातील मसाल्यांचा सर्व फ्लेवर दुधामधे उतरलेला असेल. एक चांगली उकळी आली की अग्नि बंद करावा. आपल्याला दुधाची बासुंदी करायची नाहीये, हे लक्षात ठेवावे. अन्य एव्हरेस्ट आदी कंपन्यांचे बदाम काजू पावडर घातलेले मसाले इथे अजिबात अपेक्षित नाहीत. अशी पावडर घालून दाट आटवलेले दुध पचायला जड होते. दुध पचले नाहीतर विरेचन न होता, कफ वाढण्याचीच शक्यता जास्ती.

 दुध गार होईपर्यंत ढवळत रहावे. स्वच्छ धुतलेल्या मातीच्या एका मडक्यात हे दुध ओतून त्यात रंग आणि वास येण्याएवढ्या असली काश्मिरी केशराच्या काड्या घालाव्यात. आणि एका सुती कापडाने मडक्याचे तोंड बांधून ठेवावे. आता या मडक्यातील मसालादुधावर चंद्राचा प्रकाश थेट पडेल अशा उंच ठिकाणी किमान चार तास ठेवावे. गच्चीवर गॅसशेगडी नेऊन पुनः आटवायचे नाही. चंद्राच्या शीतल प्रकाशातच ते ठेवायचे आहे. सूर्यास्त झाल्यावर लगेच चंद्रोदय होत असतो. म्हणजेच सायं. 6.30 च्या दरम्याने या तयार मसाला दुधाचे मडके चंद्रप्रकाशात ठेवावे आणि रात्री 11.30 ते 12 च्या दरम्याने हे मसाला दुध अत्यंत सावकाश प्यावे.

 खारे शेंगदाणे, शेव फरसाण, वेफर्स, भेळ, भजी इ.इ. इतर चकणा दुधाबरोबर खाऊ नये, नाहीतर दुध पोटात जाऊन नासेल आणि पचन बिघडेल. आपल्याला जेवढे पिता येईल एवढे दुध प्यावे. नंतर दोन ते तीन तास जागरण करावे. म्हणजे पोटात आजुबाजुला असलेले ( शाखेतील पित्त ) दोष कोष्ठात यायला मदत होते. आणि सकाळी एक ते दोन वेळेस पातळ संडास होईल. त्यातून पित्ताचा निचरा होतोय का हे पहावे. असे सलग तीन दिवस केल्यास सुख विरेचन होते.

 हे दूध पिताना आजुबाजुचे वातावरण आल्हाददायक असावे. तलाव, नदी, समुद्र, मोकळ्या पटांगणावर, सर्व इष्ट मित्रमैत्रिणींबरोबर, गोड बोलणारी लहान मुले सोबत घेऊन, मनाला आनंद देणार्‍या व्यक्तींसमवेत काही सामाजिक विषयावर चर्चा करावी. 

 शरद ऋतुमधील हे असे मसालादुध सर्वांचे पित्त कमी करेल यात शंकाच नाही. या विरेचनाने केवळ पोटातीलच पित्त नव्हे तर मनातील क्रोध / राग देखील कमी होतो. कोणतीही शंका विकल्प मनात न आणता असे दुध जरूर प्यावे. हाच लेख पुनः वाचावा, म्हणजे उर्वरीत शंका समाधान होईल. 


 लेखक - वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग 

 Forward by - ।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।। 

फॅमिली हेल्थ क्लिनिक कोरेगाव,

 सातारा फोन - 82087 13119.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त