सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
महिला-मुलांचे हाल, १५ ऑगस्टपासून सामूहिक उपोषणाचा इशाराSatara News Team
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
- बातमी शेयर करा
पाचगणी :जवळपास सात कोटी रुपयांच्या रस्ता व गटर बांधकामाचा गाजावाजा झाला; मात्र प्रत्यक्षात वर्षभर उलटूनही कामाचा वेग कासवगतीचाच असल्याने कुडाळकरांचा संताप शिगेला पोहोचला आहे. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून इंदिरानगर चौक ते बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक या प्राथमिक जिल्हा मार्गाचे रस्ता व गटर बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र काम वेळेत पूर्ण होण्याऐवजी एक वर्षाहून अधिक काळ दिरंगाई, अर्धवट स्थिती आणि दर्जाबाबतच्या तक्रारींमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून गटराचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचीही चर्चा सुरू आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतुकीची प्रचंड कोंडी हेच वास्तव बनले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्त्यावर वाहनांची सततची गर्दी होत असून किरकोळ कारणांवरून वादावादी होत आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर एखादा गंभीर अपघात घडल्याशिवाय जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या दिरंगाईचा सर्वाधिक फटका महिला, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. एसटी किंवा इतर वाहतूक पकडण्यासाठी ग्रामस्थांना गावाबाहेर उभे राहावे लागत असून तेथे कोणत्याही प्रकारची निवाऱ्याची सुविधा उपलब्ध नाही. पावसात, उन्हात आणि चिखलातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पुढे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण येत असताना हे काम अशाच अर्धवट अवस्थेत राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, कामाची लांबी किती, रुंदी किती, गटर कोठे होणार आणि कोठे नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्रामपंचायतीला किंवा नागरिकांना देण्यात आलेली नाही. अंदाजपत्रकानुसार काम होत आहे की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. “आमचा विकासकामांना विरोध नाही; मात्र मनमानी कारभार, माहितीचा अभाव आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या दिरंगाईला निश्चितच विरोध आहे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
यासंदर्भात जागृत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देत १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष कुडाळमध्ये येऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी, कामाची सविस्तर माहिती द्यावी, रस्ता व गटराचे नियोजन स्पष्ट करावे आणि कामाला गती द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, १४ ऑगस्टपर्यंत समाधानकारक भूमिका न घेतल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून कुडाळ ग्रामपंचायतीसमोर जागृत नागरिक आणि युवा ग्रामस्थ सामूहिक उपोषणास बसतील. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार जावळी, पोलीस अधीक्षक सातारा, मेढा पोलीस, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कुडाळ यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
सात कोटी रुपयांचे काम वर्षभर अर्धवट ठेवून नागरिकांना त्रास सहन करायला लावणे, ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची भावना कुडाळमध्ये व्यक्त होत आहे. आता १४ ऑगस्टपूर्वी प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला गती देत स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर १५ ऑगस्टपासून कुडाळकर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
संबंधित बातम्या
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 7th Aug 2026 08:19 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 7th Aug 2026 08:19 pm












