अखाड्यात शिंदेंच्या होमपीचवर राजेगटाचा राजकीय डाव यशस्वी; ६ विरुद्ध ५ मतांनी ठराव मंजूर

पाचगणी : जावळी तालुक्यातील अखाडे विकास सेवा सोसायटीच्या ठरावावरून गुरुवारी राजकीय वातावरण चांगलेच तापले. माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या होमपीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखाडे गावातच बंधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील राजेगटाने ६ विरुद्ध ५ अशा एका मताच्या फरकाने ठराव आपल्या बाजूने खेचत स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अखाडे गावातून शिंदे गटाला मोठे मताधिक्य मिळाले होते. शिल्पा शिंदे यांच्या विजयातही या गावाची महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्यामुळे याच गावातील विकास सोसायटीचा ठराव राजेगटाच्या बाजूने गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठराव अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने दोन्ही गटांनी आपल्या संचालकांची मोर्चेबांधणी केली होती. संचालकांना सहलीवर पाठवून मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा दिवसभर रंगली. मात्र अखेर दोन्ही गटांचे सर्व संचालक बैठकीला उपस्थित राहिल्याने मतदान अटळ ठरले आणि संपूर्ण बैठक तणावपूर्ण वातावरणात पार पडली.


ठरावासाठी दोन्ही गटांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती. राजेगटाकडून बंधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळी पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे आणि बाजार समिती सभापती जयदीप शिंदे यांनी नेतृत्व केले, तर शिंदे गटाकडून माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र तेजस शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समिती संचालक बुवासाहेब पिसाळ यांच्यासह समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.


मतदानात राजेगटाच्या उमेदवार उषा सुरेशराव शिंदे यांना ६ मते मिळाली, तर विद्यमान चेअरमन राजेंद्र शिंदे यांना ५ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने राजेगटाने ठराव आपल्या बाजूने वळवला आणि शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यातच राजकीय विजय मिळवला.


ठरावाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक फौजदार गंगावणे यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने अखाडे गावात दाखल झाले होते. मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


अखाडेसारख्या शिंदे गटाच्या प्रभावी गावातून राजेगटाने ठराव जिंकणे हा केवळ एका विकास सोसायटीचा निकाल नसून आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे. या निकालामुळे जावळी तालुक्यातील बदलती राजकीय समीकरणे, संचालकांची भूमिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला