‘दहशतीची भाषा बंद करा; पुरावे असतील तर जावळीच्या जनतेसमोर ठेवा!’

अंकुश कदम यांच्या आरोपांवर युवा नेते संतोष वारागडे यांचा पलटवार; ‘विकासकामांना दहशत म्हणणे म्हणजे जनतेची दिशाभूल’

पाचगणी : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर “जावळीत दहशतीचे राजकारण सुरू आहे” असा आरोप करणाऱ्या अंकुशबाबा कदम यांच्यावर युवा नेते संतोष वारागडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “केवळ व्हिडिओ बनवून गंभीर आरोप करण्यापेक्षा दहशतीचे एक तरी ठोस प्रकरण, घटना किंवा पुरावा जावळीच्या जनतेसमोर ठेवावा. पुरावा नसेल तर राजकीय स्वार्थासाठी जावळीची बदनामी करणारी भाषा बंद करावी,” अशा शब्दांत वारागडे यांनी कदम यांना आव्हान दिले.


अंकुश कदम यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर केलेले आरोप खोटे, बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा वारागडे यांनी केला. शिवेंद्रराजे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर जावळीसह सातारा जिल्ह्यात रस्ते, पूल व विविध पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळत असताना या विकासकामांकडे दुर्लक्ष करून ‘दहशत’ असा शब्दप्रयोग करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.


‘आरोप करणे सोपे; पुरावा देण्याची हिंमत दाखवा!’


“दहशत हा अत्यंत गंभीर शब्द आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी नेमकी कोणती घटना घडली, कोणावर दबाव आणला गेला, कुठे दहशत निर्माण झाली, याचे पुरावे द्यायला हवेत. केवळ कॅमेऱ्यासमोर आरोपांची तोफ डागून सत्य बदलत नाही,” असे वारागडे म्हणाले.


जावळीच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी शिवेंद्रराजे सातत्याने प्रयत्न करत असल्याचा दावा करत वारागडे म्हणाले की, विकासकामे सुरू असताना त्यांना राजकीय चष्म्यातून पाहून बदनाम करण्याचा प्रयत्न जनतेच्या हिताचा नाही.


‘रस्ते झाले तर दहशत? पूल झाले तर दहशत?’


“जावळीतील रस्त्यांची कामे झाली तर ती दहशत आहे का? दुर्गम भागातील पायाभूत सुविधा सुधारल्या तर ती दहशत आहे का? विकासासाठी निधी आणणे ही दहशत असेल, तर विरोधकांनी त्यांच्या भाषेचा अर्थ आधी जावळीच्या जनतेला समजावून सांगावा,” असा खोचक सवालही वारागडे यांनी उपस्थित केला.


अंकुश कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आरोप हे जावळीच्या हितापेक्षा वैयक्तिक राजकीय स्वार्थातून करण्यात आल्याचा आरोपही वारागडे यांनी केला. “राजकारण जरूर करा; पण जावळीच्या नावावर भीतीचे चित्र रंगवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका,” असे ते म्हणाले.


‘एक तरी प्रकरण पुराव्यासह समोर आणा!’


“शिवेंद्रराजेंच्या नावाने जावळीत खरोखरच दहशत निर्माण केली जात असेल, तर अंकुश कदम यांनी एक तरी ठोस प्रकरण पुराव्यासह जनतेसमोर मांडावे. संबंधित व्यक्ती कोण, घटना कुठे घडली, तक्रार कुठे झाली, याची माहिती द्यावी. गंभीर आरोप करून नंतर पुराव्यापासून पळ काढणे योग्य नाही,” असे थेट आव्हान वारागडे यांनी दिले.


युवा पिढी आता केवळ भाषणे, व्हिडिओ आणि आरोपांवर विश्वास ठेवणारी नसून प्रत्यक्ष कामाचा हिशेब पाहणारी आहे. कोणाच्या काळात किती रस्ते झाले, किती पूल झाले, किती निधी आला आणि दुर्गम गावांपर्यंत विकास किती पोहोचला, यावरच नेतृत्वाचे मूल्यमापन होईल, असेही वारागडे म्हणाले.


‘जावळीला आरोपांचे राजकारण नको, विकासाची स्पर्धा हवी!’


“जावळीचा विकास हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा नेत्याचा विषय नाही. विरोधकांनीही विकासासाठी पुढे यावे. चांगल्या कामाला साथ द्यावी आणि चुकीचे काही असेल तर पुराव्यांसह जनतेसमोर मांडावे. मात्र खोटे आरोप करून राजकीय वातावरण तापवण्यापेक्षा जावळीच्या विकासासाठी स्पर्धा करा,” असे आवाहन संतोष वारागडे यांनी केले.


‘जावळीची जनता सुज्ञ आहे. कोण विकासासाठी झटतोय आणि कोण केवळ आरोपांच्या धुरळ्यात स्वतःचे राजकारण शोधतोय, याचा फैसला जनता योग्य वेळी करेल,’ असा टोलाही वारागडे यांनी लगावला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला