भुईंजमध्ये थेट सरपंच भाजपचा, मात्र वरचष्मा राष्ट्रवादीचा

 वाई :  वाई तालुक्यातील सर्वात मोठी असणारी आणि राजकीयदृष्टया जिल्ह्यात ओळखली जाणारी भुईंज ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. निकालाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा लागलेल्या अटीतटीच्या लढतीत सत्ताधारी भाजपाचा थेट सरपंच गुलालात न्हाऊन निघाला मात्र राष्ट्रवादीचाही वरचष्मा यावेळी जिल्ह्याने पहिला. मागील पंचवार्षिक सत्तेत सहा सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीने यावेळी आणखी दोन सदस्य निवडून आणून आपले संख्याबळ आठ करून उपसरपंच पदाकरिता आव्हान निर्माण केले आहे. 
       भुईंज ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत राहिली. गावाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानून सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीने पंचायतीवरील वर्चस्वासाठी कसोशीने प्रयत्न केला. यातच थेट सरपंच पदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग करिता आरक्षित झाल्याने इच्छुकांच्या मध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रत्येक समाजाने आपल्याकडे सक्षम उमेदवार असल्याचे पक्षनेतृत्वाकडे सादरीकरण केले. मात्र इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये सरपंच पदाकरिता इच्छुकांची संख्या वाढल्याने येथे उमेदवारीकरिता चुरस निर्माण झाली. यातच प्रभागनिहाय उमेदवार निश्चित करताना डाव- प्रतिडावांचे राजकारण शिगेला पोहोचले. त्यामुळे दोन मातब्बर पक्षांच्या  चढाओढीत दोन अपक्ष नवतरुण उमेदवार सदस्यपदी बिनविरोध निवडून आले. या घडामोडीमुळे दोन्ही पक्षांचे तर्कवितर्क बाजूला राहिले गेले व थेट सरपंच पदाकरिता उभारलेल्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले.
       थेट सरपंच पदाकरिता भाजपकडून विजय वेळे, राष्ट्रवादीकडून सुनील शेवते, जयवंत पिसाळ, राजेंद्र शेवते, प्रमोद गवळी हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते. सर्वानीच सक्षम प्रचार यंत्रणा राबवत मतदारांनाही उमेदवार निवडीसाठी विचार करण्यास भाग पाडले होते. अखेरच्या टप्प्यात भाजपचे नेते मदनदादा भोसले यांनी उमेदवारांसह काढलेली पदयात्रा व सांगता सभा या निवडणुकीत निर्णायक ठरली. विजय वेळे हे थेट सरपंचपदी निवडून आले. सरपंचपद जरी यावेळी भाजपकडे गेले असले तरी सुनील शेवते यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. 


भुईंजमध्ये राष्ट्रवादीचे वाढलेले मतदान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. भाजपकडून निवडून आलेल्या उमेदवारांपुढे नव्याने गटबांधणीचे मोठे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोर धरू लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला