विधानसभा निवडणुक प्रक्रियेची चौकशी व्हावी

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या ! विसापूर ग्रामपंचायतीचा सर्वांनुमते ठराव

सातारा: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती की महविकास आघाडी सत्तेत येईल याबद्दल जनतेमध्ये प्रचंड चुरस होती. मात्र, निकलांती राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली. ईव्हीएम मतदान प्रक्रियेसंबंधी विसापूर ग्रामस्थांनी मनात शंका उपस्थित केली आहे. या निवडणूक प्रक्रियेविषयी निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करावी. तसेच यापुढील निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, असा ठराव विसापूर ता.खटाव ग्रामपंचायतीने एकमुखाने केला आहे. विसापूर सरपंच निलम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत पाच वाड्यांचा समावेश आहे. विसापूरचे एकूण मतदान ४००० आहे. विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवार दि. २७ रोजी पार पडली. ग्रामसभेत अनेक विकासात्मक विषयांवर व योजनांवर चर्चा झाली. ऐन वेळी येणाऱ्या विषयांमध्ये राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, शेतीमाल व दुधाला दर नाही, शेतीच्या साहित्यामध्ये दरामध्ये वाढ, वाढती महागाई, मराठा आरक्षण यासह विविध विषयांवरून जनमाणसांच्या मनामध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे.

   निवडणूक प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत होता. राज्यात महायुती की महविकास आघाडी सत्तेत येईल याबद्दल राजकीय तर्क वितर्क लढवले जात होते. केवळ लाडकी बहीण योजनेवरून एकतर्फी निकाल लागू शकत नाही. राज्यातील विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतदानाची आकडेवारी पाहता बऱ्यापैकी साम्य आढळत आहे. या निकालाची निवडणूक आयोगामार्फत सखोल चौकशी व्हावी. यापुढील काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका ईव्हीएमचा उपयोग न करता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी सूचना सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सागर साळुंखे यांनी मांडली. तर खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी अनुमोदन दिल्याने ठराव सर्वानुमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात साशंकता आहे. ग्रामसभेत या ठरावावर अतिशय विस्तृत चर्चा होऊन सर्वानुमताने मंजूर करण्यात आला. ईव्हीएम वापराविरुद्ध राज्यातील निवडणुकी नंतर प्रथमच विसापूर ग्रामपंचायतीने ग्रामसभेद्वारे हा ठराव केला आहे. विसापूर ग्रामस्थांनी या ठरावाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. 

   लोकशाहीप्रति सजगतेचे हे मजबूत पाऊल असून, अधिकाधिक भारतीय नागरिकांनी या दिशेने कृती करायला हवी, असे ही विसापूर ग्रामस्थांनी सांगितले आहे. विसापूर मधील शेकडो कुटुंब धारकांना मोफत धान्य मिळत नाही. अशा कुटुंबांना जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने धान्य देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय समोर विसापूर ग्रामस्थ आंदोलन करतील, असा ठराव करण्यात आला आहे. अनिकेत तानाजी साळुंखे या युवकाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी.

"आम जनतेच्या मनातील भावनांना आदर करीत लोकशाही बळकटीकरणासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असा ठराव गावाने मांडला. कायद्याचे पालन करीत निवडणूक आयोगास ठरावाची प्रत पाठविण्यात येईल."- राजकुमार ढोले, उपसरपंच

मी दिलेले मतदान निसंदेह असले पाहिजे : संतोष साळुंखे

"मी दिलेले मतदान निसंदेह असले पाहिजे, म्हणून ईव्हएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी. ग्रापंचायतीने घेतलेला निर्णय योग्य वाटतो. माझे मतदान बॅलेट पेपरवर झाले पाहिजे."- -संतोष साळुंखे मा.उपसभापती पंचायत समिती खटाव"

"विसापूर गावामध्ये ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटी आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराचे आहे. अशी राजकीय परिस्थिती असतानाही विसापूर मध्ये मतदान महाविकास आघाडीला कमी झाले आहे. याबद्दल आमच्या मनात साशंकता आहे. श्री कैलास साळुंखे, मा.उपसरपंच विसापूर"

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त