आव्हाने पेलण्याची धमक असलेले नेतृत्वः पुरुषोत्तम जाधव

Threatened to face challenges  Leadership: Purushottam Jadhav

सातारा  : राजकीय पक्षांची विचारसरणी, कार्यकर्ते, निष्ठा याच्या व्याख्या अलीकडील काळात बदलत गेल्या आहेत. याचा अर्थ लोक आणि राजकारणात प्रवेश करू इच्छिणारे  नवोदित शहाणे झालेत, असा घेतला तर त्यात चुकीचे नाही. आपले नेते आणि पक्ष नेमके कसले राजकारण करतात, विचारांवर किती श्रद्धा ठेवतात व कशाप्रकारे निष्ठापूर्वक काम करतात, हे आता सर्वांना माहित झाले आहे. एखाद्या पक्षाचे नाव घेऊन येथे टीका करायची नाही,  पण त्यांचा उल्लेख इथे येणे अपरिहार्य आहे. स्थापनेपासून सातारा जिल्हा आमचा बालेकिल्ला, बालेकिल्ला म्हणून ढोल बडवणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाची आजची बदहालत आपण पाहत आहोत. त्यांचे लोकप्रतिनिधी  म्हणजे ठरावीक घराण्यांची मक्तेदारी आहे. वीस-वीस, तीस-तीस वर्षे  मतदारसंघावर ते हुकमत गाजवतात.  पुन्हा त्यांची तिसरी पिढी! त्यांच्या या जहागिरीत प्रयत्नपूर्वक मोठे होऊ इच्छिणारे पूर्वी अनेक होते. कालप्रवाहात ते बाजूला फेकले गेले. एखादाच झेडपी - पंचायत समितीवर गेला.  त्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलल्या. आता ते दिवस गेले. खुर्च्या उचलण्यासाठी रोजंदारीवर माणसे आणावी लागतात. कार्यक्रम किंवा आंदोलनासाठी तीच माणसे गोळा करावी लागतात. याउलट शिवसेनेने तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली. तिथे जातीपातींची अडचण आली नाही. टपरीवाले,  रिक्षावाले सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते मोठे झाले. मात्र तीन वर्षांपूर्वी कंपूशाहीचे ग्रहण लागलेल्या शिवसेना नेतृत्वाने आपली संघटना राष्ट्रवादीसारख्या लालची पक्षाच्या दावणीला बांधली आणि सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ झाले. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत राहणे त्यांच्या नशिबी आले.  शिवसेनेचे नामधारी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर तर पक्षसंघटना ही नावालाच उरली. कार्यकर्त्यांना किंमत उरली नाही. लालची पक्षाने शिवसेनाही संपविण्याचे कारस्थान पध्दतशीरपणे सुरू केले, ते शिवसेना पक्ष चालवणाऱ्यांना कळले नाही. या अस्वस्थतेला मोकळी वाट करून देण्याचे काम ना. एकनाथ शिंदे यांना करावे लागले. शिंदे गटाकडे  नंतर आजी माजी लोकप्रतिनिधी व निष्ठावंतांची रांग लागली.ना. शिंदे हे भूमिपुत्र असलेल्या सातारा जिल्ह्यातून सर्वप्रथम पुरुषोत्तम जाधव यांनी त्यांना साथ दिली. २००९ साली पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादीचा दबदबा होता. त्यांच्या गळतीला सुरुवात झालेली नव्हती. तर शिवसेनेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली हाेती.  लोकसभा व विधानसभेसाठी उमेदवार शोधावे लागत होते. कार्यकर्त्यांमध्ये जोम, उत्साह नव्हता. काही पदाधिकारी आपल्या लाभापुरते पक्षसंघटनेचा वापर करून घेत होते. त्यावेळी पक्षाने लोकसभेसाठी  तिकीट साहेबांना दिले. समोर बलाढ्य उमेदवार व बालेकिल्ला म्हटला जाणारा राष्ट्रवादी पक्ष असतानाही न डगमगता त्यांनी आपले आव्हान उभे केले. आपण लढू शकतो, ही भावना  साहेबांनी शिवसैनिकांमध्ये निर्माण केली. तेव्हापासून त्यांनी चार वेळा सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघातून खासदारकी व  वाई- खंडाळ्यातून आमदारकीच्या निवडणुका लढवल्या आणि लक्षवेधी मते घेतली.  एका अर्थाने पक्षसंघटनेत चैतन्य कायम ठेवण्याचे काम पुरुषोत्तम जाधव यांनी केले.  पक्षाने दिलेल्या जबाबदारी सोबतच आव्हाने पेलण्याची धमक दाखविल्यानेच त्यांचाही चाहता मतदारवर्ग जिल्ह्यात निर्माण झाला.नामधारी मुख्यमंत्रिपद देऊन  संपूर्ण सरकारवरच मांड ठोकणारा बारामतीकरांच्या पक्षाविषयी गेल्या अडीच वर्षांपासून शिवसैनिकांमध्ये रोष होता. नार्वेकर- राऊत सारखी जनाधार नसलेली बोलघेवडी मंडळी पक्षाच्या आमदारांना  जुमानत नव्हती तेथे सामान्य शिवसैनिकांची काय कथा! शिवसेनेने जणू राष्ट्रवादीचे मांडलिकत्व स्वीकारले होते. त्यातून नव्या स्वाभिमानी शिवसेनेचा उगम होत गेला. डोळ्यांवर  पट्टी बांधलेल्या कुचकामी नेतृत्वाला व भोवतालच्या हुजऱ्यांना हे कळलेच नाही. या सर्वांनी आपली निष्ठा- पक्ष - संघटना सर्वकाही पवार कुटुंबाच्या चरणी वाहिले होते. अंधभक्ती असावी तर अशी!! पक्ष संपला तरी चालेल पण पवारांवरील निष्ठा सोडणार नाही!!! याच दुराग्रहामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घराणेकेंद्रित व स्वकेंद्रित घाणेरड्या राजकारणाला कंटाळलेल्या शिवसैनिकांच्या रोषाला मोकळी वाट करून देण्याचे काम पुरुषोत्तम जाधव यांनी केले. त्यात भूछत्रासारख्या कधीतरी उगवणा-या मंडळींनी उध्दव निष्ठेचा आव आणला. यात ना. शिंदे यांच्या स्थानिक तालुक्यांतील काही शिवसैनिकांचा समावेश होता. मात्र पुरूषोत्तम जाधव यांच्या झंझावातापुढे  ते अस्तित्वहीन झाले. सर्वसामान्यांबरोबरच नेत्यांना आकृष्ट करणारे नम्र व संस्कारी बोलणे, लोकांकडून मिळणारी आपुलकीची भावना, दर्यादिली, लोकांच्या समस्यांसाठी संघर्ष करण्याबरोबरच कला-  क्रीडा - सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव काम या गोष्टींमुळे सार्वजनिक जीवनातील साहेबांच्या लोकप्रियतेचा आलेख चढता राहिला. २००९ पासून प्रस्थापितांबरोबर दोन हात करताना पुरुषोत्तम जाधव यांनी आपला लढाऊ बाणा सोडला नाही. शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात उद्धव ठाकरे आज राऊतांमुळे ज्या बारामतीकरांना  फेविकॉलप्रमाणे चिकटले आहेत त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता.  डोळे उघडे ठेवून नेतृत्व अंध झाले हाेते. शिवसेनेचा पाया असणारे सामान्य शिवसैनिक घुसमटले होते. दुबळ्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीची दादागिरी सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निष्ठावंतांचा ओघ वाढला आहे. त्याची ताकदही वाढली.  सहकारी भाजप विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तम साथ दिल्याने सरकार येण्याबरोबरच शिंदे यांचे हात बळकट झाले आहेत. हे  दोघेही सत्ता बदलाच्या काळात साथ दिलेल्या नेत्यांचे हात बळकट करीत आहेत. त्यामुळे भविष्यात लोकहिताची कामे करणारी स्थानिक नेत्यांची नवी फळी राज्याच्या, देशाच्या राजकारणात उभी राहू शकते.  त्याचे प्रतिनिधित्व पुरुषोत्तम जाधव हे करीत आहेत. केंद्र राज्यातील असणारे सरकार व त्याहीपेक्षा पुरुषोत्तम जाधव यांचा कामाची आस असणारा सामान्य लोकांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारा चेहरा  ना. एकनाथ शिंदे व ना. देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. सामान्यांच्या या चेहऱ्यावर विश्वास ठेवून ना. शिंदे सातारा जिल्ह्यात जनहिताची कामे करण्याबरोबरच पक्षसंघटना दुप्पट जोमाने बळकट करतील, अशी लोकांची  अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्यात कृषी, एमआयडीसी, कला- क्रीडा, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रात कामे करण्याची चांगली संधी भूमिपुत्र असलेल्यांना एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. ही जबाबदारी त्यांनी व भाजप  नेतृत्वाने पुरुषोत्तम जाधव यांच्यावर सोपवली आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील विकासाचा दोन वर्षांचा आराखडा साहेबांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. ना शिंदे यांनी त्यांच्यातील गुणवत्ता ओळखली आहे.  विकासकामांबरोबरच पक्ष वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन पुरूषोत्तम जाधव ना. शिंदे व ना. फडणीस यांचा विश्वास सार्थ करतील, अशी अपेक्षा आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त