एका भिल्ल समाजातील कलेक्टर पदा परर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास.
अनिल करंदकर
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
- बातमी शेयर करा
सातारा ; एखाद्याचा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा कोणाच्या हतात नसतं. साक्री तालुक्यातीला सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतलेल्या या तरुणाची कहाणी काही वेगळीच..
जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिला असता तर आज ही आयएएस ऑफिसरची मजल गाठता आलीच नसती.
त्याला त्याच्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली.
उसाच्या पालाची झोपडी म्हणजे त्याचं घर. मायच्या पोटात होता तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. आपले वडील कसे होते हे त्याला कधीच कळलं नाही.
त्यांच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा, तो. पिणारेही घरीच यायचे.
माय सांगते, हा लहान होता, दुधासाठी रडायचा; पण दारू पिणार्यांना त्रास नको म्हणून याच्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे तो गपगुमान झोपेल.
मोठा झाला आणि मग दारू पिणार्यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागला. हे काम करणं भागच होतं.
पण म्हणून मायनं त्याला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि याला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होता. घरी येऊन अभ्यास करत होता. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. या जमातीत शिकायला जाणारी ही पहिलीच पिढी होती.
एकदा परीक्षा होती. ओट्यावर बसून अभ्यास करत होता. दारू प्यायला आलेल्या एकानं त्याला चकणा आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे याने सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि "शिकून असा कोणचा डॉक्टर - इंजिनिअर होणार ?" असं म्हणून हिणवलं.मायला ते शब्द खूप लागले. आणि " होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर " असं ठामपणे म्हणून गेली.त्या माणसाच्या हिणवण्यानं त्याला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला.
पण क्षणभरच….
मायनं दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं त्यानं ठरवलं. पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.
गावापासून १५० किमी. दूर होती शाळा. माय आली होती सोडायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच त्याला रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर त्यानं ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच.
तो घरापासून दूर राहून शिकत होता. मन लावून अभ्यास करत होता. दहावीला उत्तम गुणांनी पास झाला. बारावीला ९७ टक्के गुण मिळाले आणि स्वतर्च्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.
कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. तो वैद्यकीय शिक्षण घेत होता; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर ह्याला पैसे कसे पुरवता आले असते ?
एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला होता. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास.
मायचे कष्ट हीच त्याची प्रेरणा होती.
बाकी मायला त्याच्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर तो फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं.यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि इथे तिचा मुलगा आयएएस ऑफिसरची तयारी करत होता.वर्ष संपलं. आणि एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.
घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी…
मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. तेव्हा मायला सांगितलं की तो डॉक्टरकी पास झालाय.मायला खूप आनंद झाला; पण मग लगेच सांगितलं की त्यानं डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना.तो म्हणाला की डॉक्टरकी सोडली कारण तो आता कलेक्टर झाला आहे.मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांना पण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता.
लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत त्याचं कौतुक केलं.
कलेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. २०१२ पासून त्याची माय आता त्याच्या सोबत आहे. इथे करण्यासारखं खूप आहे.नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच तो या पदावर आहे.आज त्याला अनेकजण विचारतात की अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं त्याला कधी अनुभवताच आलं नाही.
पण तो म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच त्याच्यात ताकद येत होती.
अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहत होता, डोंगर चढत होता, शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं.तेव्हा आजूबाजूला तरी कोण होतं. माय, आणि आपलीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय.त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती.
सगळे सारखे. …
कोणाच्या आनंदानं स्वत:च्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा? छान वाटत होतं. गरिबीत पण आनंद वाटत होता.पण मुंबईला शिकायला गेला आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वत:च्या परिस्थितीचं दुख मानलं नाही.पहाटे साडेचारला उठायचा, योग करायचा, अभ्यासाला बसायचा. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती.
हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता.
तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिला असता, आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाची कथा उगाळत राहिला असता, तर इथवर पोहोचलाच नसता.आपले दिवस पालटण्यासाठी त्यानं कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. त्याला इतकंच कळत होतं, आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता…वयाच्या ३१ व्या वर्षी तो आता कलेक्टर झाला आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसला असता.इथे पोहोचेर्पयत आपण काय गमावलं यापेक्षा आपल्या संघर्षानं स्वतःला आज काय दिलं हे तो महत्त्वाचं मानतो.
आज ३१ व्या वर्षी त्याच्याकडे काय नाही?
जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारुड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते.
इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.
लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी सगळ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे...
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Thu 16th Feb 2023 02:42 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 16th Feb 2023 02:42 pm










