पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

     पुसेसावळी  : पुसेसावळी हे गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक 'शांत' खजिना! दिवसा शेतकरी शेतात राबतात, रात्री मात्र गौण खनिज उत्खनन, गुटखा, सोरट, चक्री, मटका, गांजा... आणि कदाचित 'सुपरसोनिक स्पीड'ने येणाऱ्या अवैध धंद्यांचा मेळावा चालतो. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "रात्रीस खेळ चाले" हे वाक्य इथे शब्दशः खरे ठरतंय. पण चिंता नका, कारण पुसेसावळी दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक (PSI) हे सगळं पाहतायत... फक्त डोळे बंद करून! शहरात रात्रीच्या अंधारात जुगार अड्डे चमकतायत, अवैध दारूची नदी वाहतेय, सट्ट्याचे 'लॉटरी' चालू आहेत, मंथलीची "चक्री" वेगाने फिरते, गुटख्याचे डेपो उघडपणे फुललेत... पण पुसेसावळी दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक मात्र 'दृष्टी दोष' किंवा 'रात्रीचे चष्मे' घालून फिरतायत का? कारण त्यांना हे सगळे दिसतच नाही'!

        सुमारे गेल्या दिड वर्षांपासून संपूर्ण पुसेसावळी शहर ३७ सीसीटीव्हीच्या कक्षेत आलंय, असं सांगितलं जातंय. म्हणजे आता अवैध गौण खनिज वाहतुकीचे ट्रक, गुटख्याचे पॅकेट्स, मटक्याचे अड्डे... सगळं २४ तास दुरक्षेत्रातच 'लाइव्ह' रेकॉर्ड होतंय. पण प्रश्न असा की, हे फुटेज पाहून उपनिरीक्षकांची नेत्रे सुपरसोनिक होतात की सुपर-स्लीप मोडमध्ये जातात? ज्यामुळे अवैध धंदे 'फ्री फायर' मोडमध्ये चालू आहेत. संबंधित उपनिरीक्षक साहेबांना कदाचित 'इन्व्हिजिबिलिटी क्लोक' मिळालाय का? की हे धंदे 'VIP पास' असलेले आहेत?" त्यामुळे अवैध धंद्यांचा बोलबाला इतका वाढलाय की, जणू काही नवीन 'स्टार्टअप' सुरू झालंय ते ही फक्त "अवैध व्यवसायिकांची बेरोजगारी दूर करण्यासाठी"!

              स्थानिकांच्या माहिती नुसार "११ ते ५ महसूल अधिकारी याठिकाणी फक्त कागदोपत्री कामांकरीताच उपलब्ध असतात, पण कारवाईसाठी मात्र प्रत्यक्षात गायब. रात्री मात्र उत्खनन चालू, डंपर धावतायत, आणि पोलिसांची गाडी? तीही कदाचित 'सुपरसोनिक' वेगाने दुसऱ्या दिशेला निघाली असेल!" सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार, असं वचन दिलं गेलं. पण प्रत्यक्षात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी अवैध धंदेवाल्यांच्या हातात 'सोन्याचा भाव' आलेला गौण खनिजाचा भाव वाढतोय. त्यासोबतच जुने बसस्थानक परिसरात सोरट-चक्रीसारखे 'नवीन' धंदे सुरू झालेत. हे सगळे धंदे इतके बेधडक चालतायत की, जणू काही पोलिसांनी त्यांना 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' दिलंय! जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून यापूर्वी 'जरब' बसवली गेली होती, पण आता? "सपशेल अपयशी" असा शब्दप्रयोग स्थानिक पत्रकार करतायत. तरीही उपनिरीक्षकांचे नेत्र मात्र 'सुपरसोनिक' वेगाने... झोपतायत!

           काही ठिकाणी जुगार अड्ड्यावर गाडी पोहोचते तेव्हा धंदेवाले 'हाय-फाय' म्हणून निघून जातात. हे काय 'सेलेक्टिव्ह ब्लाइंडनेस' आहे की काय?"

कारभारी बदलला की अवैध धंद्यांना 'सुगीचे दिवस' येतात, असं सांगितलं जातं. पण इथे तर कारभारी कोणताही असो, धंदेवाले 'परमानेंट जॉब' करतायत आणि पोलिस 'परमानेंट लीव्ह' वर असल्यासारखे दिसतात. तर मा.उपविभागीय पोलिस अधिकारी, वडूज यांच्याकडे याबाबत प्रतिसाद मागितला असता, लवकरच मी स्वतः येऊन एक दिवस अशी कारवाई करणार की पुन्हा अवैध व्यवसाय दिसणार पण नाहीत असे सांगितले जाते. पण 'तो' दिवस म्हणजे "मुंगेरीलाल के सपने" असावेत कदाचित.

              शेवटी एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुसेसावळी दुरक्षेत्रात अवैध धंद्यांचा अंधार आहे, हे खरं. पण उपनिरीक्षकांची नेत्रे इतकी 'सुपरसोनिक' का की, अंधारातही काहीच दिसत नाही? की मग हे नेत्र फक्त फाइल्समध्ये 'क्लोज्ड सर्किट' टीव्ही पाहण्यासाठीच वापरली जातायत?

                                    विद्यमान उपनिरीक्षकांचे काम म्हणजे "मी नाही त्यातली, अन्..."

            "पुसेसावळी दुरक्षेत्राची सुत्रे विद्यमान पोलिस उपनिरीक्षकांनी हातात घेतल्या पासून संवैधानिक स्वरूपाने अवैध व्यवसायीकांवर केलेल्या केसेस अथवा कारवाया या नाममात्र असल्या तरी त्या शासनाची फसवणूक तसेच कागदोपत्री पुर्तता करण्याच्या दृष्टीने "विनंती वजा मागणी" करून केल्याच्या उघडपणे दिसत असल्याने मी नाही त्यातली अन्..... ची चर्चा सुरू आहेत. त्यामुळे संबंधित पोलिस उपनिरीक्षकांचे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे."

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला