पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!

पुसेसावळी : पुसेसावळी हे शहर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चोरट्यांच्या हल्ल्याखाली आहे. दिवसाढवळ्या किंवा रात्रीच्या अंधारात होणाऱ्या या घरफोडी व चोरीच्या घटना आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. तरीही स्थानिक पोलिस प्रशासन मात्र या गुन्हेगारीला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

     मागील काही काळापासून पुसेसावळी व परिसरात अनेक ठिकाणी घरफोडी, दागिन्यांची चोरी, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लंपास होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे दिसून येते, पण आजतागायत एकही आरोपी पकडला गेलेला नाही. याशिवाय गावात रात्रीच्या वेळी दुकाने आणि घरांमध्ये प्रवेश करून चोऱ्या करण्याचे सत्र सुरूच आहे. पुसेसावळी शहरातील महत्वाची ठिकाणे,चौक, शाळा, बसस्थानक असे सुमारे ३८ सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापुर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक समिर शेख आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून बसविण्यात आले आहेत. याचे कंट्रोल गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने पुसेसावळी दुरक्षेत्रात  ठेवण्यात आले आहे. परंतू विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांचे दुर्लक्ष आणि मेंटेनन्स ची बिले न काढल्याने वारंवार कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. 

     तसेच गावकरी सांगतात की, "आम्ही रात्री झोपताना भीतीने घाबरतो. कधीही कोणी घरात शिरेल आणि सर्व काही नेले तर काय करायचे? पोलिस येतात, तक्रार घेतात, पण त्यानंतर पोलिसांची नुसती हालचाल दिसते परंतू कारवाई दिसून येत नाही."

पोलिसांची निष्क्रियता आणि उदासीनता ग्रामस्थांना अस्वस्थ करत आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या असूनही गुन्हेगारांना पकडण्यासाठी ठोस कारवाई दिसत नाही. काही गावकऱ्यांच्या मते, "चोरटे गावातून जातात, पण पोलिसांना काहीच कळत नाही. हे सगळे पाहून वाटते की पोलिस प्रशासन हतबल झाले आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे?"

      या परिस्थितीत ग्रामस्थांनी आता स्वतः रात्री गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पण हे तात्पुरते उपाय आहेत. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांचीच आहे. पुसेसावळीतील नागरिकांना आता प्रश्न पडतोय - आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? स्थानिक पोलिस प्रशासनाने तात्काळ या चोरीच्या साखळीला तोडण्यासाठी विशेष पथक नेमणे, रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढविणे आणि लावलेले सीसीटीव्ही सुस्थितीत सुरू राहण्यासाठी वेळेवर मेंटेनन्स करून घेणे तसेच मुख्य ठिकाणी उच्च प्रतीचे स्कॅनर कॅमेरे बसविण्या सारखे महत्वाचे निर्णय घ्यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा हे सत्र आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


औंध पोलिस ठाण्यात पुरेसा कर्मचारी पुरवठा करणे आवश्यक


        पुसेसावळी पोलिस दुरक्षेत्र हे ज्या औंध पोलिस ठाण्याचे अंतर्गत येते त्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असून यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत असल्याने कर्मचारी वर्ग तणावाखाली वावरत आहेत. पुरेशा प्रमाणात पेट्रोलिंगचा अभाव असल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून कार्यरत कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करत स्फुर्तीने काम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला