सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

CEIR पोर्टलच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत

सातारा : हरवलेले, चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून ते नागरिकांना परत मिळवून देण्याची विशेष मोहीम सातारा जिल्हा पोलिसांनी राबविली. या मोहिमेत भारत सरकारच्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यातून सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे ४४९ मोबाईल हँडसेट हस्तगत करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते संबंधित मोबाईलधारकांना हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. सातारा जिल्हा पोलीस दलाची वार्षिक निरीक्षण तपासणी दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.

सन २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलसंदर्भात सातारा जिल्ह्यात तब्बल १४ हजार ३०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींमधील मोबाईलचा IMEI क्रमांक आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात आला. या कारवाईत आतापर्यंत ४ हजार ८४२ मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले आहेत.

CEIR पोर्टलच्या माध्यमातून विविध ठिकाणी वापरले जात असलेल्या हरवलेल्या अथवा चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्यामुळे मोबाईलचा शोध घेण्यास तसेच त्याचा गैरवापर रोखण्यास मदत झाली.

या मोहिमेमुळे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान मोबाईलचा परतावा मिळाला असून, चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासही पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी तसेच पोलीस अंमलदार प्रशांत मोरे, ओंकार डुबळ, संदीप पाटील, राकेश घाडगे, रामदास भास्करवाड, स्वप्नील शिंदे, किरण जगताप आणि प्रवीण फडतरे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला