अविरत कार्यमग्नतेचा अखंडित प्रवास : श्रीमंत संजीवराजे

 फलटण :   महाराष्ट्रातील समृद्ध ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेल्या फलटण संस्थानात नाईक निंबाळकर हे राजघराणे आदर्श राज्यकारभार  करत होते. इ.स.१२४४ पासून या संस्थांनातील अनेक शूर, वीर-पराक्रमी राज्यकर्त्यांनी या संस्थांनात रयतेभिमुख राजकारभार करून नाईक निंबाळकर राजघराण्याचा नावलौकिक वाढविलेला आहे. आधुनिक काळात श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कारकिर्दीमध्ये फलटण संस्थांनात सर्वांगीण प्रगतीची मुळे रुजली गेली. त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी “अपत्य स्थाने प्रजाजनः” हे जनहिताचे ध्येय बाळगून त्याप्रमाणे प्रजाहितदक्ष राजा व स्वातंत्रोत्तर काळात लोकप्रतिनिधी म्हणून जनहिताच्या सर्वच क्षेत्रामध्ये फलटण संस्थानासह राज्यपातळीवर आदर्श कारभार केला. श्रीमंत मालोजीराजे यांचे द्वितीयपूत्र राजकुमार विजयसिंह ऊर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनीही आपल्या वडिलांचे विचार व कार्याची धुरा समर्थपणे वाहण्याचा प्रयत्न केला.        

    अशा जनसेवेचा उत्तम वारसा असलेल्या या नाईक निंबाळकर राजघराण्यात ९ ऑक्टोंबर १९६४ रोजी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म झाला. पिताश्री श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे आणि मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी यांच्या उत्तम संस्काराचे बाळकडू त्यांना बालपनीच मिळाले. श्रीमंत शिवाजीराजे यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व महाराष्ट्र विधानसभा सदस्य या पदांच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात लोकविकास साधून आपल्या घराण्याचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. लोकविकासाचा हाच वारसा जतन करत पुढील काळात श्रीमंत संजीवराजे यांनी आपले कार्य केलेले दिसून येते.

        श्रीमंत संजीवराजे यांचे शालेय शिक्षण ‘संजीवन इंग्लिश स्कूल’, पाचगणी व ‘श्री. शिवाजी प्रिपॅरेटरी मिलिटरी स्कूल’, पुणे या ठिकाणी झाले. त्यांना शिक्षणाबरोबरच खेळ आणि व्यायाम यामध्ये विशेष रुची होती. विशेषत: फुटबॉल या क्रीडा प्रकारात त्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले होते. मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पदवी परीक्षेत त्यांनी शिवाजी विद्यापीठात ‘इतिहास’ या विषयात ‘गोल्डमेडल’ पटकावलेले आहे. येथूनच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा शुभारंभ झाला असे म्हणता येईल.        दिनांक १७ फेब्रुवारी १९९१ रोजी श्रीमंत संजीवराजे यांचा विवाह कोल्हापूर येथील प्रतिष्ठित महागावकर -देसाई घराण्यातील सुकन्या श्रीमंत शिवांजलीराजे यांच्याशी झाला. पुढील काळात सर्वच क्षेत्रात त्यांची श्रीमंत संजीवराजे यांना खंबीर साथ मिळत गेली.     

    १९९१ मध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक कार्याला सुरुवात झाली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या जेष्ठ बंधुद्वयांचे मार्गदर्शन व सहकार्यातून सर्वप्रथम त्यांनी तालुक्यातील तरुण युवकांचे उत्तम संघटन बांधले. “श्रीराम विकास सोसायटी” या सहकारी संस्थेद्वारे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा शुभारंभ झाला. नंतर श्रीमंत संजीवराजे यांनी फलटण पंचायत समिती, सभापती आणि सातारा जिल्हा परिषद - उपाध्यक्ष व अध्यक्ष या प्रमुख पदांच्या माध्यमातून फलटणसह सातारा जिल्ह्यातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९९२ पासून सलग ६ वेळा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मतदार संघातून त्यांनी  जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व  विजय संपादन केला. त्यांच्या बरोबरच जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ. शिवांजलीराजे यांनीही सलग ५ वेळा जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत वेगवेगळ्या मतदार संघातून विजय मिळवून त्यांना खंबीरपणे साथ दिली.    

      जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य, रस्ते इत्यादी नागरीसुविधा जिल्ह्यातील सर्व वाड्या-वस्त्यापर्यंत पोहोचविल्या. याच काळात त्यांच्या कल्पक व कुशल नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे १२०० बैठक व्यवस्था क्षमता असलेले अत्याधुनिक पद्धतीचे ‘स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशीय सभागृह’ उभारण्यात आले. तसेच श्रीमंत संजीवराजे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण – २०१८ ’या केंद्र सरकारच्या सर्व्हेमध्ये देशातील ‘प्रथम स्वच्छ जिल्हा सातारा जिल्हा’ हा ‘प्रथम क्रमांकाचा’ पुरस्कार पटकाविला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नवी दिल्ली येथे हा बहुमान त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.     

   सन २००२ मध्ये श्रीराम साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीराम साखर कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात त्यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले. आजही नाईक निंबाळकर व आवाडे परिवारांच्या माध्यामातून श्रीराम-जवाहर हा भागीदारी तत्वावरील साखर उद्योग पुन्हा सक्षमपणे उभा करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलेले आहे.    

   श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द पहावयास मिळते. त्यांच्या आर्थिक नियोजनामुळेच सुवर्ण महोत्सवी वर्षात रिझर्व्ह बँकेने या बँकेचा आर्थिकदृष्ट्या सुदृढ, सुव्यवस्थापित बँक कॅटेगिरी मध्ये समावेश केला आहे. याबरोबरच श्रीमंत सईबाई महाराज महिला पतसंस्था व नरसोबा पतसंस्था या आर्थिक संस्थांनाही ते बहुमोल मार्गदर्शन करत असतात.   

    फलटण एज्युकेशन, सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून श्रीमंत संजीवराजे यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आज कला, वाणिज्य व विज्ञान, संगणक व व्यस्थापन, अभियांत्रिकी, नर्सिंग, कृषी व उद्यानविद्या आणि फार्मसी या विविध महाविद्यालयातून युवकांना आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाद्वारे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत.     

   क्रीडा क्षेत्रामध्ये ही श्रीमंत संजीवराजे यांनी भरीव कार्य केलेले आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. या माध्यमातून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खो-खो स्पर्धांचे आयोजन करून फलटणमध्ये क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल व मुधोजी क्लबच्या माध्यमातून आज फलटणमध्ये अनेक खेळाडू आपल्या यशस्वी कारकिर्दीस सज्ज होत आहेत.  

       उद्योगाच्या क्षेत्रात श्रीमंत संजीवराजे यांचे कार्य अव्वल ठरलेले आहे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक शेतकरी व कष्टकऱ्यांच्या जीवनात ‘धवलक्रांती’ करण्याची किमया साधली गेली आहे.‘गोविंद’च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे सात लाख लिटर्स दुधाचे संकलन केले जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिलांसाठी शेतीपूरक उद्योगांचे नवे दालन खुले झाले असून शेतकरी व विशेषत: ग्रामीण महिलांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे. आज संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही ‘गोविंद‘ने भरारी घेतलेली आहे. गोविंदच्या या कार्याची दखल म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘वसंतराव नाईक पुरस्कार आणि ’इंडियन डेअरी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा पश्चिम विभागीय उत्कृष्ट डेअरी प्रकल्प पुरस्कार - २०२४ हा मानाचा पुरस्कार दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते प्रदान करून ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स ’ या उद्योग समूहाचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.  

      याबरोबरच कुरोली फुड्स, व्यंकटेश अंग्रो प्रोसेसिंग, झुसामेन लाइफ सायन्सेस & रिसर्च प्रा.लि.  मॅग्नेशिया केमिकल्स एल. एल.पी., अॅरिष्टा केमिकल्स या उद्योगाच्या माध्यमातून तालुक्यातील सुशिक्षित युवकांसाठी रोजगार व पूरक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यास श्रीमंत संजीवराजे यशस्वी ठरलेले आहेत. 

       महाराजा मालोजीराव सिल्हर ज्युबली हॉस्पिटलच्या माध्यमातून समस्त फलटणकरांसाठी आद्ययावत आरोग्यसेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात विश्वस्त म्हणून श्रीमंत संजीवराजें यांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे. कोरोना काळात मॅग्नेशिया केमिकल्सचा ऑक्सिजन प्लांट या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यावेळी अनेक रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. याशिवाय नाईक  निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटिज ट्रस्ट आणि गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळातील पाणी टँकर, चारा छावण्या असोत वा इतर विविध समाजपयोगी कामे असोत, तसेच ‘आय केअर’ च्या माध्यमातून दीड लक्ष वृक्षारोपण करण्याचा संकल्प असो या सर्वच संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपलेलेली दिसते.  

        श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठान व कृषी उत्त्पन्न बाजार समिती या संस्थांच्या प्रगतीसाठीही श्रीमंत संजीवराजे यांचे उत्तम सहकार्य व बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.  आपल्या कार्यातून फलटण तालुक्यातील सर्वच घटकांचा विकास व्हावा याबाबत ते नेहमीच आग्रही व अग्रेसर राहिलेले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आधुनिकता, नाविन्यता, संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञान युक्त बाबींचा समावेश व्हावा यासाठी विविध देशातील विविध उपक्रमांना भेटी देऊन तेथील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नेहमीच सतर्क व सज्ज असतात. याकरिता  त्यांनी जर्मनी, नॉर्वे, फ्रान्स, स्वीडन, इंग्लंड, सिंगापूर, इराण व दुबई या देशांमधील आधुनिक तंत्रज्ञान युक्त विविध प्रकल्पांना भेटी दिल्या आहेत.         या सर्व कामांचा व्याप सांभाळत श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत सत्यजितराजे, श्रीमंत विश्वजितराजे व श्रीमंत अजयसिंहराजे या राजघराण्यातील पुढच्या पिढीलाही ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. याशिवाय पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, नौकाविहार, जंगल सफारी , ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन असे अभिनव छंदही जोपसण्याचा ते प्रयत्न करतात.   

     आज गेली ३५  वर्ष श्रीमंत संजीवराजे  फलटण तालुक्याच्या विकासाठी अविरत परिश्रम घेत आहेत. श्रीमंत रामराजे महाराजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही राजकीय पदाची महत्त्वाकांक्षा न बाळगता केवळ  फलटण तालुका व राजेगटासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. श्रीमंत रामराजे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारलेले धोम- बालकवडी व नीरा- देवघर हे महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प तसेच कमीन्स या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रकल्पाच्या उभारणीत श्रीमंत संजीवराजे यांनी श्रीमंत रामराजे यांना मोलाची साथ दिली आहे. तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाणसाहेब यांच्या राजकीय प्रवासातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.    

     आज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती सईबाई महाराणीसाहेब यांचा आदर्श, छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा, साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांचे आशीर्वाद व श्रीमंत मालोजीराजे यांचे संस्कार श्रीमंत संजीवराजे यांच्या या यशस्वी प्रवासास बळ देत आहे.   

      श्रीमंत संजीवराजे यांचा फलटण तालुक्याच्या विकासासाठी असा हा अहोरात्र झंजावात सर्वच क्षेत्रात चालू आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हा अथक आणि अविरत कार्यमग्नतेचा अखंडित प्रवास सदैव सक्षमतेने सुरु राहावा, वृद्धिंगत व्हावा व त्यांच्या कार्यात त्यांना यशप्राप्ती लाभावी यासाठी प्रभू श्रीरामचंद्र त्यांना शक्ती व सामर्थ्य देवो हीच प्रार्थना ! 


 डॉ. अशोक शिंदे,

 प्राध्यापक, मराठी विभाग,

 मुधोजी महाविद्यालय, फलटण.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त