फलटणचा राजे गट ‘धनुष्यबाण’ हाती घेणार?

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच एका व्हॉट्सॲप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजे गटाचे सोशल मीडिया प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्हाचे स्टेटस ठेवून त्यावर ‘१००%’ असा उल्लेख केल्याने, राजे गट आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

       अक्षय गायकवाड हे कोळकी गावचे राजे गटाचे नेते मानले जातात आणि संपूर्ण राजे गटाची सोशल मीडियाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या स्टेटसमुळे आता आगामी नगरपालिका निवडणुकीत राजे गट हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार की, नगरपालिकेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एबी फॉर्म मिळणार, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. ३० वर्षांची सत्ता राखण्यासाठी राजे गटाने हा नवा राजकीय डाव टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    राजे गटाच्या या संभाव्य निर्णयामुळे राजकारणात आल्यापासून हा गट शरद पवार यांच्या विचारधारेशी जोडलेला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली. लोकसभा निवडणुकीत बदलाचे वारे ओळखत त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे धाव घेतली. विधानसभा निवडणुकीत तर राज्यात सर्वात प्रथम जाहीर झालेले अजित पवार गटाचे तिकीट झुगारून त्यांनी शरद पवार गटाच्या ‘तुतारी’वर निवडणूक लढवली, मात्र तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

     आता पुन्हा एकदा सत्तेची गणिते जुळवण्यासाठी राजे गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आधार घेत असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी विचारांसाठी ओळखली जाते. त्यामुळे राजे गटाची वाटचाल आता कट्टर हिंदुत्वाकडे सुरू झाली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

       नगरपरिषद निवडणुकीत महायुती आणि इतर विरोधकांचे आव्हान परतवून लावण्यासाठी राजे गटाला एका भक्कम चिन्हाची आणि सत्तेच्या पाठिंब्याची गरज आहे. अक्षय गायकवाड यांचे स्टेटस हे केवळ सूचक विधान आहे की येत्या दोन दिवसांत होणाऱ्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला