रात्री- अपरात्री ड्रोन उडवतंय तरी कोण? अनेक चर्चांना उधाण

फलटण:  तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीचे ड्रोन उडविण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्री- अपरात्री उडणारे हे ड्रोन नेमके उडवतोय कोण? याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. या ड्रोनमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. रात्री- अपरात्री विविध ठिकाणी हे ड्रोन उडवतंय तरी कोण? याचा तपास लावण्याचे पोलिस यंत्रणेसमोर आव्हान आहे.

तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून रात्री- अपरात्री ड्रोन उडविले जात आहेत. तालुक्याच्या बागायत पट्टा समजल्या जाणाऱ्या पूर्व भागातील गावांत हे प्रमाण अधिक आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी केली जाते. बंद घरे फोडली जातात, ड्रोन घरातील सोने ठेवलेली जागा शोधते, ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाते, अशा एक ना अनेक चर्चेला सध्या ऊत आला आहे.

नीरा नदीकाठच्या गावात नदीपलीकडील भागातून ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याचेही बोलले जाते. त्यातच सोशल मीडियावर ड्रोन उडवणारे पोलिसांनी पकडले, ड्रोन नव्हे ते विमान आहे, ते खेळण्यातील ड्रोन आहेत, ऑनलाइन कुणालाही भेटतात, अशा व्हायरल होत असलेल्या संदेशांमुळे नागरिकांच्या भीतीत व गोंधळात भर पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात व ग्रामीण भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. एखाद्या ठिकाणी ड्रोन असल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, कर्मचारी तत्काळ धाव घेतात; परंतु आजवर त्यांच्याही हाती ठोसपणे काहीही लागले नाही. गावागावात ड्रोन उडत असल्याचे मेसेज येत असले तरी त्या भागात चोरी अथवा चोरीचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, शहरानजीक व ग्रामीण भागात बऱ्याच गावात ड्रोन उडत असल्याचे दावे केले आहेत. उडणारी ड्रोनचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. आकाशात उंचावर उडणारे नेमके ड्रोन आहेत की विमान? ऑनलाइनवर ड्रोन काही हजारांत मिळते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत कोणी कोणी ऑनलाइन ड्रोन मागवले, या दृष्टीनेही तपास होणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. नागरिकांत भीती पसरविण्यासाठी कोणी असा प्रकार करत असेल, तर त्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.

भाडेकरूंची नोंद करा

फलटण शहर व ग्रामीण भागात बाहेरील विविध राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले परप्रांतीय भाड्याने राहतात. अशा परप्रांतीयांची कुठलीही नोंद पोलिस ठाण्यात केलेली नाही. त्यामुळे घर मालकाने भाडेकरूंची नोंद पोलिस ठाण्यात करावी, याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.

ड्रोनबाबत पोलिस यंत्रणा सतर्क आहे. ड्रोन व चोरी यांचा एकत्रित काहीही पॅटर्न दिसून आलेला नाही. याबाबत समाज माध्यमावर संदेश व्हायरल करणारांचे क्रमांक पोलिसांना द्यावेत. ड्रोनबाबतचे कॉल संपूर्ण पुणे व सातारा जिल्ह्यात शिरवळ, लोणंद, फलटण, दहिवडी या पट्ट्यातून येत आहेत. अफवांना न घाबरता नागरिकांनी असा प्रकार दिसल्यास पोलिसांना कळवावे.

- राहुल धस,

पोलिस उपअधीक्षक, फलटण

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त