साताऱ्यात भेळच्या गाड्यावर बालमजुरांचा छळ; तिघांवर गुन्हा

सातारा : भेळच्या गाड्यावर १३ वर्षांच्या दोन मुलांना कामाला ठेवून त्यांचा छळ  करण्यात आला. याप्रकरणी राजस्थानातील एका व्यक्तीसह तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश डांगी (रा. राजस्थान, हल्ली रा. कोंडवे पेट्रोल पंपासमोर, ता. सातारा), दीपक आणि कमलेश, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांचा साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात 'श्रीनाथ भेळ' या नावाचा गाडा आहे. या गाड्यावर त्यांनी १३ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना कामाला ठेवले होते. हा प्रकार जिल्हा बाल व संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख (रा. शाहूपुरी काॅलनी, सातारा) यांच्या निदर्शनास आला. 

यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही अल्पवयीन मुलांची चाैकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पीडित दोन्ही बालमजुरांना दररोज लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. तसेच उपाशी पोटी ठेवून शारीरिक क्षमतेपेक्षा अवजड कामे करायला लावत होते. शिळे अन्न खायला देणे तसेच त्यांची मजुरी न देणे, त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधू न देणे, अशी विविध गैरकृत्य संशयित करत होते. ही मुले १४ वर्षांच्या आतील आहेत, हे माहीत असूनही त्यांनी या बालमजुरांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा छळ सुरू होता.सातारा तालुका पोलिस ठाण्यात संशयितांवर बालकास क्रूर वागणूक देऊन त्यांचे शोषण करणे, यासह विविध कलमांन्वये बुधवारी रात्री पावणेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला