ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'

माण-खटाव तालुक्यात अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे 'अभय'

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण-खटाव तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी ऊत आणला असून याच अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे अभय मिळत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या या भागात अवैध धंद्यांची पाळेमुळे अगदी शहरापासून गावोपाड्यात खोलवर रुजल्याने ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास' झाला असल्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे. 

     माण-खटाव तालुक्यात दहिवडी उपविभागांतर्गत येणाऱ्या दहिवडी, म्हसवड, वडूज, औंध या प्रमुख पोलीस ठाण्यांच्या ग्रामीण हद्दीमध्ये अवैध प्रकारे चालणारी दारू विक्री, मटका, जुगार, तीनपत्ती यांसह अनेक वाळू उपशाचे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहे. या सर्व ठिकाणी चाललेल्या अवैध धंद्यांना त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने अवैध धंदेवाले सध्या जोमात आहेत. याठिकाणच्या काही गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतरही कारवाई करण्यास पोलीस कुचराई करत असून यातूनच यांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे लागेबांधे समोर येत आहेत. 

   दहिवडी, म्हसवड, खटाव, वडूज, कातरखटाव, औंध, पुसेसावळी, गोंदवले, चौकीचा आंबा या प्रमुख ठिकाणांसह अन्य इतर भागातही दारू विक्री, मटका, जुगार, तीनपत्ती यांसारखे अवैध धंदे जोमात सुरु असून येथील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

  गेल्या चार टर्म माण-खटाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे या दोन्ही तालुक्यांत एकहाती वर्चस्व आहे. जयकुमार गोरे यांच्याबाबत झालेल्या मागील प्रकरणामुळे विरोधकांच्यामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. त्यामुळे माण-खटाव तालुक्यात विरोधक न राहिल्याने साहजिकच सर्वच्या सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे मंत्री जयकुमार गोरे यांचेच ऐकत आहेत. त्यामुळे साहजिकच याचाच गैरफायदा घेत मंत्री जयभाऊंच्या जवळचेच कार्यकर्ते अवैध धंद्यांचे मालक बनले आहे. काही ठिकाणी याला अपवाद असला तरी मात्र पोलीस प्रशासनाच्या खाबूगिरीमुळे अवैध धंद्यांना या दुष्काळी तालुक्यात सुकाळ आला आहे. 

   तत्कालीन डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या काळात अनेक अवैध धंदेवाल्यांनी आपले वाढविलेले बस्तान सध्या रुजू झालेले डीवायएसपी रणजित सावंत यांच्या कार्यकाळात देखील त्याच जोमाने सुरु आहे. दहिवडी उपविभागातील पोलीस खाते सध्या खाबुगिरीत व्यस्त असून मतदार संघातील लोकप्रतिनिधी व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे हे राज्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत अवैध धंदेवाले आणि पोलीस प्रशासन यांनी माण-खटाव तालुक्यात अवैध धंद्यांचा ग्रामीण विकास करण्याचा ध्यास घेतला असून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्वतः यात लक्ष घालून ही अवैध धंद्यांची पाळेमुळे खोदून काढावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

दहिवडीतील मोरे वस्तीवर दराडेंचा वरदहस्त 

    दहिवडीतील मोरे वस्ती भागात सुरु असलेल्या अवैध तीनपत्ती धंद्यावर दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचा विशेष वरदहस्त असल्याचे समोर येत आहे. मोरे वस्ती येथील शिवारातील एका शेडवजा घरात सुरु असलेला हा अवैध धंदा गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने सुरु आहे. मात्र पोलीस तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे नागरिकांनी वारंवार तोंडी तक्रारी करून देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे कारवाई करत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे डीवायएसपी रणजित सावंत यांना देखील या ठिकाणी कारवाई करता आली नाही, ही पोलीस खात्याची नामुष्की म्हणावी लागेल.

डीवायएसपी शेंडगेंनी पेरलेले पीक सावंत खाणार कि नांगरणी करणार? 

   तत्कालीन डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी अवैध धंद्यांना एकप्रकारे अलिखित परवानगी देत धंदेवाल्यांकडून लाचखोरी घेण्याचे काम केल्याचा आरोप दबक्या आवाजात होत आहे. अवैध धंदेवाल्यांकडून केलेल्या या पीक पेरणीची राखण पोलीस ठाण्यांच्या प्रभारींवर देण्यात आली होती. सध्या डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आलेले नूतन डीवायएसपी रणजित सावंत हे शेंडगे यांनी पेरलेले हेच पीक अजून मोठे करून खाणार कि आलेल्या पिकाची नांगरणी करत अवैध धंद्यांची पाळेमुळे खोदून काढणार, हे पाहावं लागणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला