किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

भुईंज : भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे व माहिती देऊन बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेने केली. याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतर काहीजणांवर पुणे येथील पोलिस आयुक्तालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास विस्तारीकरणासाठी बँक ऑफ इंडियाने ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. २०१० पासून कारखान्याचे आणि बँकेचे चांगले व्यावहारिक संबंध होते. त्यामुळे बँकेने एवढी मोठी रक्कम कर्ज स्वरूपात कारखान्याला मंजूर केली. ही रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या करंट खात्यावर वळविण्यात आली. यावेळी बँकेने १ कोटी ७० लाख ४३१ रुपये ३८ पैसे व्याज खात्यामध्ये जमा करून घेऊन ही रक्कम कारखान्याला दिली होती. त्यानंतर ही रक्कम कारखान्याकडून थकीत झाली.

दरम्यान कारखान्याने डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून कारखान्याच्या डिस्टिलरी उभारणीसाठी 'बँक ऑफ इंडिया' ला दिलेली मालमत्ता तारण देऊन बँकेची फसवणूक केली. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे खोटी आर्थिक विवरणपत्रे व कागदपत्रे सादर केली व बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केला. हे कर्ज प्रकरण थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सीबीआय (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २४ मे २०२४ रोजी पुणे येथील पोलिस आयुक्तालयात हा गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त (नवी दिल्ली) मनीष नवलाखे हे अधिक तपास करत आहेत.

काय कारवाई केली याची माहिती मिळाली नाही

कर्ज घेतल्याची घटना २०१० ची असून त्या कर्जाचा योग्य तो विनियोग झालेला आहे. याबाबत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. याबाबत संबंधित खात्याने काय कारवाई केली आहे. कोणत्या कारणाने केली आहे. त्याची सविस्तर माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. संबंधित बँकेचे कर्ज कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या प्रयोजन कार्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले होते. त्यातील काही रक्कम भरावयाची राहिली असेल ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत कारवाई असावी. संपूर्ण माहिती मिळेपर्यंत त्याबद्दल काही बोलू शकत नाही. सध्या दोन अडीच वर्षांपासून आमचे व्यवस्थापन किसनवीर कारखान्यावर नाही. 

मदन भोसले, माजी अध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईंज.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त