माणिक जगताप - अकाली अस्ताला गेलेला सूर्य
Satara News Team
- Thu 14th Jul 2022 11:52 am
- बातमी शेयर करा
कोरोनाच्या संकटात एक वेगळे माणिकराव पहायला मिळाले. पायपीट करत कोकण गाठणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारे, रस्त्यावर उतरुन त्यांना जेवणाची, वाहनाची व्यवस्था करुन देणारे माणिकराव हे कोकणातील एकमेव नेते होते
महाड : चालण्यात सिहाचा डौल , बोलण्यात जेवढे प्रेम तेवढीच गरज असेल तेव्हा जरब, झपाट्याने काम करण्याची वृत्ती, वागण्यात अदब. त्या माणसाकडे पाहिल्यानंतर मृत्यु सोडाच, हा माणूस कधी म्हातारा तरी होईल का असा विचार सहज मनात डोकावायचा. पण अनेकवेळेस अकल्पित , अनपेक्षित घटना घडत असतात. गतवर्षी महाडकर नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. एकच माणूस या संकटानंतर आपल्याला सावरेल हा विश्वास असलेले महाडकर त्या संकटालाही धिराने तोंड देत होते.पुढे काही तरी या पेक्षाही अनपेक्षित घडेल याची कल्पना ही महाडकरांना नव्हती. २६ जुलैची सकाळ महाडकरांवर वज्राघात करणारी. महाडचे माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त त्या सकाळी महाडमध्ये आले आणि चिखल गाळ साफ करणाऱ्या महाडकरांचे हात थाबले. श्वास अडकला. पुराच्या आणि आपत्तीच्या संकटापेक्षाही हे मोठे संकट असल्याची जाणीव झाली. दैवाच्या या खेळापुढे महाडकर अक्षरशः हतबद्ध झाले. आजही एक चांगला, संकटांना धीराने सामोरा जाणारा आणि जायला लावणारा, संकटात मदतसाठी स्वतः मैदानात उतरणारा माणूस गमावल्याची खंत, दुःख, वेदना महाडकरांमध्ये आहे.
राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर जनसेवेसाठी करायचे हे माणिकरावांचे सार्वजनिक जीवनातील तत्व. समाजकारणासाठी पद किंवा सत्ता असलीच पाहिजे असे नाही. तळमळ मात्र असावी लागते. माणिकराव असेच तळमळीने काम करणारे नेते होते.पुरातत्व विभागाने रायगडवरील धनगरांच्या झोपड्या शाकारण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर , माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल , या कुटुंबांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत, त्यांच्या झोपड्या शाकारुन देणारे माणिकराव आठवतात. एखाद्या आदिवासीवाडीवर आदिवासींच्याच बोलीभाषेत संवाद साधित त्यांच्यात समरस होणारे माणिकराव आठवतात. कुडपणच्या एका घरात घोंगडीवर बसून चरणी भाकरी खाणारे माणिकराव आठवतात. सभेत फड्या वत्कृत्वाने मैदान गाजविणारे, मित्रांमध्ये हसत खेळत रममाण होणारे, कुटुंबाप्रती हळवे होणारे , लाडक्या पुतण्याच्या निधनाने कोसळलेले माणिकराव आठवतात.
किल्ले रायगडच्या पायथ्याला असलेल्या सांदोशी गावात एका सरदार घराण्यात जन्माला आलेल्या माणिकरावांमध्ये सरदाराच्या रक्तात असणारी जन्मजात धमक होती. त्यामुळे सत्ता किंवा पद असो किंवा नसो, चिकाटीने आणि वेळप्रसंगी जरबेने शासन दरबारातून काम करुन घेण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. २००५ सालच्या नैसगिक आपत्तीमध्ये ती पहावयास मिळाली. त्या वर्षी महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांवर महापूर आणि दरडींचे संकट कोसळले. शेकडो माणसे दरडींखाली गाडली गेली. मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. शासनाच्या खनपटीला बसून माणिकरावांनी शासनाला निर्णय घ्यायला लावले. अनेक जुने आणि कालबाह्य निर्णय बदलायला लावले. आपदग्रस्तांना कॅश डोल देण्यापासून ते त्यांच्या पुनर्वसनापर्यंतचे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावले आणि हे दोन्ही तालुके पुन्हा उभे केले. गतवर्षी २१ आणि २२ जुलैला त्याच घटनांची पुनरावृत्ती झाली. दुर्दैव असे की त्यावेळेस माणिकरावांची रुग्णालयात मृत्युशी झुंज सुरु होती. माणिकराव बरे होवून परत येतील , आपल्याला आधार देतील हा विश्वास प्रत्येक आपदग्रस्ताच्या मनात होता. पण तसे घडायचे नव्हते. २६ जुलैला माणिकराव गेले. पण २००५ मध्ये त्यांनी मदत आणि पुनर्वसनाचे जे निर्णय शासनाला घ्यायला लावले त्या निर्णयांचा फायदा गतवर्षीही ते आपदग्रस्तांना मिळवून देवून गेले. शेवटच्या श्वासापर्यंत हा माणूस सामान्यासाठी कार्यरत होता याचे दुसरे उदाहरण अभावानेच सापडेल.
महाड आणि पोलादपूर हे दोन्ही तालुके दुर्गम आणि डोंगराळ. या तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हीच त्यांची तळमळ. तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्य, एक वेळेस आमदार म्हणून काम करताना विविध योजनांचा लाभ मतदार संघातील गावांना मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण , आरोग्य या मुलभूत सुविधा त्यांनी गावागावात उपलब्ध करुन दिल्या. काळ - कुंभे जलविद्युत प्रकल्प , महाडचे ट्रॉमा केअर सेंटर , कोतेरी धरण प्रकल्प , महाडची पोलीस वसाहत, असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाड नगरपालिकेचे भव्य दिव्य असे प्रशासकीय भवन त्यांनी उभे केले. कामगार उत्कर्ष सभेच्या माध्यमातून महाड औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांनी मिळवून दिले. लोकविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिब विद्यार्थ्याना चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केली.लोकविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कला, क्रीडा विषयक उपक्रम त्यांनी राबविले. कलावंत , खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रेरणा दिली.
माणिकरावांचे व्यक्तमत्व अष्टपैलुच नव्हे बहुपैलू होते. त्यांच्या सानिध्यात जो जो आला त्याला माणिकराव स्वतःसारखे भासले. नेत्यांमध्ये नेत्यांसारखा , कामगारांमध्ये कामगारांसारखा , शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांसारखा , कष्टकऱ्यांमध्ये कष्टकऱ्यांसारखा, क्रीडापटूंमध्ये खेळाडूसारखा त्यांचा वावर असायचा. त्यामुळे प्रत्येक समाज घटकाला ते आपले वाटायचे.त्यांच्या या स्वभाववैशिष्ठ्यांमुळेच ते सर्वाच्याच गळ्यातले ताईत बनले.
विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात सक्रीय झालेल्या माणिकरावांनी आपल्या सुमारे चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवले. तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे संघर्ष करुन मिळविलेले उपाध्यक्षपद, बांधकाम सभापतीपद, एकदा आमदारकी भूषविलेल्या माणिकरावांनी विधानसभेतील चार पराभव खिलाडू वृत्तीने स्विकारले होते. प्रत्येक पराभवानंतर नव्या उमेदीने उभे राहिलेले माणिकराव या मतदार संघाने पाहिले. समाजासाठी आपले उत्तरदायित्व आहे या भावनेतून प्रत्येक वेळेस ते उमेदीने कार्यरत राहिले.
कोरोनाच्या संकटात एक वेगळे माणिकराव पहायला मिळाले. पायपीट करत कोकण गाठणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारे, रस्त्यावर उतरुन त्यांना जेवणाची, वाहनाची व्यवस्था करुन देणारे माणिकराव हे कोकणातील एकमेव नेते होते. कोरोमासाठी जिल्हा आपत्ती निधीत स्वतःची पेन्शन जमा करणारे एकमेव नेते होते. महाड पोलादपूर तालुक्यात कोरोनाचे संकट वाढू लागल्यानंतर लोकविकास सामाजिक संस्था, महाड नगरपालिका आणि महाड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून कोरोना सेंटर सुरु करुन कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाची उपचार व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे काम त्यांनी केले. शेकडो कोरोना रुग्णांना नवे जीवन देणाऱ्या माणिकरावांचा घात दुर्दैवाने याच कोरोनाने केला.
ते नाहीत यावर आजही विश्वास बसत नाही. पण त्यांच्या स्मृतींच्या वाती त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात चिरंतन तेवत राहणार आहेत. त्यांच्या कार्याचा दरवळ अखंड पसरत राहणार आहे. त्यांना विनम्र अभिवादन

सौ. कविता मोहन जगताप
माजी जिल्हा परिषद सदस्य मेढ़ा गट
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 14th Jul 2022 11:52 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 14th Jul 2022 11:52 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 14th Jul 2022 11:52 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 14th Jul 2022 11:52 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 14th Jul 2022 11:52 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 14th Jul 2022 11:52 am
संबंधित बातम्या
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Thu 14th Jul 2022 11:52 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Thu 14th Jul 2022 11:52 am












