मायणीत पावसामुळे पूरस्थिती उद्भवली

मल्हारपेठ - पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली

मायणी  :  मायणी येथे आज बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र एकच हाहाकार उडाला असून मल्हारपेठ - पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्वत्र वाहतूक खोळंबली होती. तसेच अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले आहे.
                         याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेले चार दिवस मायणी व परिसरात पावसाचा जोर पहावयास मिळाला आहे. आजच्या पावसाचा जोर अधिकच असल्याने मायणी येथील मल्हारपेठ - पंढरपूर महामार्ग, मायणी - मोराळे,मायणी -प्राथमिक आरोग्य केंद्र,मायणी- लक्ष्मीनगर,मायणी - शेडगेवाडी असे विविध रस्ते ठिकठिकाणी ओढ्याच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले. तसेच भूमापक कार्यालय परिसर , पोलीस दुरक्षेत्र परिसरातील काही घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची धांदल उडाली होती. त्याठिकाणच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू,अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. 
                          तसेच पावसाचे पाणी शेतीत साचल्याने अनेक ठिकाणी बांध फुटून ठिकठिकाणी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक कोंडीत सापडला आहे.
                          आजच्या ढगफुटी सदृश पावसामुळे पुराची परस्थिती उद्भवली असतानाही प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष असल्याचे पहावयास मिळाले. परिणामी पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयांना स्थानिक युवकांनी मदतीचा हात देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना संबंधित शालेय शिक्षकांनी स्वतः पुर आलेल्या रस्त्यापासून दूर ठेवून पालकांना संपर्क करीत त्यांना सुरक्षित घराकडे पाठवण्याची व्यवस्था केली.
                   
 
          "मोराळे रस्त्यावरील ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे आमच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य,अन्नधान्य,कपडे,इलेक्ट्रिकल वस्तू भिजून मोठे नुकसान झाले आहे. तसेच माझे रेशनिंग दुकानाचे दफ्तरी साहित्यही पाण्यात भिजले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. -  मिलिंद पुस्तके,ग्रामस्थ.मायणी".

 "मायणी येथे निर्माण झालेल्या पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी सायंकाळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली  ज्याठिकाणी अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण झाली त्याठीकणचे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश प्रशासनास त्यांनी दिले. तसेच ज्या रस्त्यांवर पुराचे पाणी आले आहे ते रस्ते तात्पुरते बंद करण्यास स्थानिक प्रशासनास आदेश दिले.  यावेळी नायब तहसीलदार महेश गायकवाड, तलाठी गौरव खटावकर,पोलीस पाटील प्रशांत कोळी,रणजित माने यांची उपस्थिती होती."

 

 

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला