म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!

दहिवडी : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगरपरिषदेची निवडणूक वादळी ठरली.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे या गोरे बंधूंना घेरण्यासाठी माजी मंत्री महादेव जानकर,सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी प्रदेश युवकचे सरचिटणीस अभयसिंह जगताप,प्रभाकर देशमुख यांनी एकत्र येत जोरदार मोर्चेबांधणी केली.त्यांनी एकत्र येऊन राजेमाने कुटुंबातील भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली.तर दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टीकडून सर्वसामान्य व नवखा चेहरा असणाऱ्या पूजा सचिन विरकर यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले.


शेखर गोरे गटाच्या गौरी विशाल माने यांनी माघार घेत पूजा विरकर यांना जाहीर पाठिंबा दिला.म्हसवड मधील शेखर गोरे यांच्या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व २१ उमेदवारांनी केलेल्या विनंतीवरून शेखर गोरे गटाच्या सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिला.त्याचवेळी सत्तेची समीकरणे बदलली.जयकुमार गोरे यांच्यासह बंधू शेखर गोरेही प्रचाराच्या मैदानात उतरले.मंत्री गोरे यांच्यावर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील २६ नगरपंचायत,नगरपालिकांच्या प्रभारी पदाची जबाबदारी असल्याने ते व्यस्त होते.परंतु बंधू शेखर गोरे यांनी कोपरा बैठका,घर टू घर प्रचार दौरे घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली.


गोरे बंधूंनी यापूर्वी म्हसवड नगरपालिका लढवल्याने सर्व प्रभागांचा त्यांना अभ्यास होता.राज्यात व देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.जयकुमार गोरे यांचा म्हसवडमध्ये असलेला पुणे,मुंबई,बेंगलोर कॉरिडॉरचा ड्रीम प्रोजेक्ट,म्हसवडकर जनतेसाठी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा याचा एकंदरीत विचार करून म्हसवडकर यांनी भारतीय जनता पार्टीला स्वीकारले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे युवराज सूर्यवंशी यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या घड्याळाला सोडचिट्टी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते.गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून म्हसवडकरांनी त्यांना कौल दिला होता.परंतु यावेळी ते घड्याळावर नव्हे तर कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते.त्यामुळे म्हसवड नगरपरिषद निवडणुकीत म्हसवडकर त्यांना स्वीकारणार का?याची उत्सुकता जिल्ह्यासह राज्याला लागली होती.माजी उपनगराध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी व युवराज सूर्यवंशी या पती-पत्नीला अनुक्रमे प्रभाग सहा व सातमधून भारतीय जनता पार्टीने संधी दिली.नेटके नियोजन,प्रभागाचा अभ्यास,जनतेतील जनसंपर्क यामुळे दोघांनाही फरकाने निवडून येता आले. प्रभाग सात हा युवराज सूर्यवंशी यांचा बालेकिल्ला होताच परंतु प्रभाग सहा मधून राजेमाने कुटुंबातील जिजामाला राजेमाने यांना राष्ट्रवादीने संधी दिली होती.


त्यामुळे प्रभाग सहा मधून नव्याने मैदानात असलेल्या स्नेहल सूर्यवंशी यांना मतदार स्वीकारणार का? याची चर्चा मतदानापासून मतमोजणी पर्यंत रंगत होती.परंतु प्रभाग सहा मधूनही स्नेहल सूर्यवंशी मोठ्या फरकाने निवडून आल्या. सूर्यवंशी कुटुंबीय प्रभाग सहा मध्ये पायाला भिंगरी बांधून फिरत होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रचारासाठी मैदानात उतरला होता.याचमुळे अजितदादांचा पट्ट्या कमळ चिन्हावर निवडून आला असल्याचे जिल्ह्याने पाहिले.म्हसवड मध्ये गेल्यावेळी परिवर्तनची सत्ता होती.त्यानंतर जवळपास चार वर्षे प्रशासक असल्याने भाजपा व एकंदरीत जयकुमार गोरे नऊ वर्षे सत्तेपासून दूर होते.नऊ वर्षांनी सत्ता आल्याने भाजपाचे कार्यकर्ते चार्ज झाले असून इतिहासात प्रथमच सूर्यवंशी दाम्पत्य नगरपरिषदेच्या सभागृहात जनतेचे प्रश्न मांडताना दिसणार आहे.


सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता.परंतु वाई,फलटण,मलकापूर,म्हसवड,सातारा, रहिमतपूरसह अनेक नगरपंचायत,नगरपरिषदेत कमळ फुलल्याने राष्ट्रवादी,काँग्रेससह शिवसेनेचा सुपडासाफ झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या नेतृत्वात म्हसवड नगरपालिका वन साईड आल्याने त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील वजन चांगलेच वाढले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला