डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा

दहिवडी उपविभागात अवैध धंद्यांना पोलिसांकडूनच खतपाणी; सिद्धेश्वर कुरोलीतील मॅनेज कारवाई हास्यास्पद

सातारा : दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच कोलदांडा दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ४ दिवसांपूर्वी सातारा न्यूजने 'माण-खटाव तालुक्यांत 'कानून के छोटे' झालेत' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करत माण-खटाव तालुक्यातील अवैध धंद्यांची पोलखोल केली होती. 

प्रामुख्याने डिस्कळ, पुसेगाव, पुसेसावळी, वडूज, दहिवडी, मायणी, कलेढोण, वडगाव, सिद्धेश्वर कुरोली, चौकीचा आंबा, म्हसवड, गोंदवले यांसारख्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. या ठिकाणी मटका, जुगार, तीन पत्ती, चक्री, दारू विक्री, गुटखा विक्री यांसारखे अनेक अगदीच धंदे राजरोसपणे सुरु आहेत. पोलीस प्रशासन मात्र या अवैध धंदेवाल्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. असे चित्र निर्माण झाले आहे. सातारा न्यूजच्या या बातमीची दखल घेत डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी दहिवडी उपविभागातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काल सिद्धेश्वर कुरोली येथे मॅनेज कारवाई करत वडूज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडूनच डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या आदेशाला कोलदांडा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 वडूज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर कुरोली येथे एका शेडमध्ये 'तीन पत्ती' जोमात सुरु असून त्याठिकाणी आलिशान गाड्यांमधून काहीजण येत असून दररोज याठिकाणी डाव रंगत असल्याची खात्रीशीर माहिती डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वडूज पोलीसांना सदर ठिकाणी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, याच सूचना वजा आदेशाला पद्धतशीर कोलदांडा देत हास्यास्पद कारवाई केली. वरिष्ठांची सूचना मानून कारवाईसाठी गेलेल्या वडुज पोलिसांनी डोंगर पोखरुन उंदीर बाहेर काढला. त्याठिकाणी ४ जणांवर कारवाई करत जुगाराच्या साहित्यासह फक्त एक हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये संजय किसन पाटोळे (रा.सिद्धेश्वर कुरोली), अमोल लबडे (रा.वडूज), सुरजकुमार सिंग (रा.वडूज), अभिजित जाधव (रा.सिद्धेश्वर कुरोली) या चौघांवर कारवाई करण्यात आली असून यामधील अनेकजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे वडूज पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. 

 दरम्यान, माण-खटाव तालुक्यांत असे अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असून याठिकाणी धन-दांडग्यांचीही मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मात्र अशा ठिकाणांची पोलिसांना माहिती पडत नाही, हे नवलच म्हणावे लागेल. मात्र, लक्ष्मीदर्शन होत असल्याने या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. काल सिद्धेश्वर कुरोली येथे झालेली कारवाई हि मॅनेज झाली असून वाहत्या गंगेत पोलिसांनी हात धुवून घेत कागदोपत्री नाममात्र कारवाई दाखवली आहे, अशी माहिती देखील एका प्रत्यक्षदर्शीने नाव उघड न करण्याच्या अटीवर सातारा न्यूजला दिली आहे. 

त्यामुळे माण-खटाव तालुक्यातील अवैध धंद्यावर पोलिसांची मेहेरनजर असून वरिष्ठांना न जुमानता याठिकाणी कर्मचारी अवैध धंद्यांना पाठबळ देत असून पोलीस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी स्वतः ग्राउंडवर उतरून अवैध धंद्यांना चाप बसविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात पोलीस ठाण्यातच अवैध धंद्यांचे डाव रंगल्यास नवल वाटायला नको. वरिष्ठ कारवाई करो या ना करो पण सातारा न्यूज येत्या काळातही अवैध धंद्यांची पोलखोल करतच राहील.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त