एकत्र राहण्याचा हट्ट केल्याने महिलेला संपवले; दोन आरोपी ताब्यात

सातारा : रेवडी, ता. कोरेगाव येथे अज्ञात महिलेचा धोम डाव्या कालव्यालगत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह सुभद्रा राजेंद्र मुंडेकर वय ४० राहणार मुंडेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर या महिलेचा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या महिलेने आरोपी राजेंद्र जगन्नाथ देशमुख रा. मुंडेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. नगर यांच्याकडे एकत्र राहण्याचा हट्ट केल्याने त्या रागातून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलीस यांनी या खून प्रकरणात संयुक्तरीत्या तपास केला.
याबाबतची अधिक माहिती अशी, रेवडीच्या पोलीस पाटील रूपाली शिंदे यांनी 4 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मळवी नावाच्या शिवाराशेजारील कालव्यालगत अज्ञात महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याची खबर दिली होती. यावरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान सातारा पोलिसांसमोर होते. 

पोलीस पथकाने मृतदेहाच्या अंगावरील कपडे दागिने या वर्णनावरून आयसीजेएस प्रणालीद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या महिलेचे वर्णन श्रीगोंदा पोलीस ठाणे येथील एका हरवलेल्या महिलेच्या वर्णनाशी जुळले. सातारा पोलिसांनी माहिती घेतली असता ती महिला सुभद्रा मुंढेकर असल्याचे स्पष्ट झाले. ती 28 मे 2024 पासून बेपत्ता होती. रात्री अकराच्या सुमारास ती राजेंद्र जगन्नाथ देशमुख नावाच्या इसमासोबत निघून गेल्याचा संशय होता.
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर इसमाचा शोध घेतला असता तो मुंडेकरवाडी, ता. श्रीगोंदा येथेच असल्याची माहिती प्राप्त झाली. कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि तपास पथकाने त्याला तिथून ताब्यात घेतले. देशमुख याची कसून चौकशी केली असता सुभद्रा मुंडे व त्याचे प्रेम संबंध असल्याची त्याने कबुली दिली. ही महिला त्याच्यासोबत एकत्र राहण्याची जबरदस्ती करत होती. म्हणून त्याने 30 मे रोजी त्याचा मित्र बिभीषन सुरेश चव्हाण रा. बाभळगाव, ता. इंदापूर, जिल्हा पुणे याच्यासोबत महिलेला टाटा सुमो गाडीतून गोवा येथे फिरण्यात घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा महिलेने एकत्र राहण्याचा हट्ट केल्याने राजेंद्र देशमुख याने रागाच्या भरात बिभीषण चव्हाण यांच्या सहकार्याने रेवडी तालुका कोरेगाव येथील मळवी नावाच्या शिवारात तिचा गळा आवळून खून केला आणि तिचे हातपाय बांधून तिचा मृतदेह धोम डावा कालव्यामध्ये टाकून दिला.

या क्लिष्ट खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलीस यांनी कौशल्याने उघडकीस आणला. या तपास कामात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पृथ्वीराज साठे, रोहित फारणे, विश्वास शिंगाडे, ज्ञानेश्वर साबळे, राहुल कुंभार, सचिन साळुंखे, विक्रांत लावंड, अमोल धनावडे, ज्योतीराम शिंदे, समाधान शेडगे, प्रमोद जाधव, अक्षय शिंदे, गणेश शेळके, हेमंत सोनवणे, राहुल ढोणे यांनी तपासात भाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त